युक्रेन युद्ध संपुष्टात आणण्यासाठी रशिया इच्छुक


Last Updated on December 24, 2022 by Vaibhav

मॉस्को: रशियाचे राष्ट्रपती व्लादमीर पुतीन यांनी युक्रेन युद्ध लवकरात लवकर संपुष्टात आणण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले. अमेरिकेकडून रशियाला कमकुवत करण्यासाठी युक्रेनचा युद्धभूमीसारखा वापर करण्यात येत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

रशियाने फेब्रुवारी महिन्यात युक्रेनवर हल्ला केला होता. काही दिवसांत युक्रेन काबीज करण्याच्या उद्देशाने युद्ध लादणाऱ्या रशियाला अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही. उलट या युद्धामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पुतीन यांनी युद्ध लवकर संपवण्याच्या दृष्टीने केलेले वक्तव्य विशेष महत्त्वाचे आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना पुतीन म्हणाले की, कोणतेही युद्ध असले तरी ते कधी ना कधी संपुष्टात येतेच. युक्रेन हे जितक्या लवकर समजेल तितके चांगले होईल.

हे युद्ध लवकरात लवकर संपुष्टात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यावेळी त्यांनी अमेरिकेवरही आरोप केले. रशियाला कमकुवत करण्यासाठी अमेरिकेकडून युक्रेनचा युद्धभूमीसारखा वापर सुरू आहे. युक्रेनला लष्करी मदत देऊन ते युद्धाला अधिक चिथावणी देत आहेत, असे पुतीन म्हणाले. अलीकडे अनेक रशियन अधिकाऱ्यांनी युक्रेनसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. या सर्व घडामोडी पाहता रशिया लवकरात लवकर या युद्धातून बाहेर पडू इच्छित असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे युक्रेनने रशियाचा अधिक प्रबळपणे सामना करण्याचा निर्धार केला असून, अमेरिकेकडून या देशाला मोठी मदत देण्यात येत आहे.

युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की नुकतेच अमेरिका दौऱ्यावरून परतले. अमेरिकेत त्यांचे जंगी स्वागत झाले. अमेरिकन संसदेत त्यांनी भाषण दिले. बलाढ्य रशिया विरोधी युद्ध संपुष्टात आणण्यासाठी अजिबात तडजोड करणार नाही, असे झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: नासाच्या ‘इनसाईट लँडर’ ची बॅटरी डाऊन