महसूलमंत्री विखे-पाटील यांचे आरोप खोटे व दिशाभूल करणारे


Last Updated on December 28, 2022 by Vaibhav

नागपूर : वाशिम गायरान जमीन वाटप हे तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात झाले, अशी खोटी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी देऊन राज्यातील जनतेची दिशाभूल केली असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाने केली. आपले भ्रष्ट चेले अब्दुल सत्तार यांना वाचवण्यासाठी विखे-पाटील असत्य कथन करत असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे.

वाशिम जिल्ह्यातील ३७ एकर गायरान जमीन तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जून २०२२ मध्ये आपल्या पदाचा दुरुपयोग करून खासगी व्यक्तीला बेकायदेशीररीत्या देऊन गैरव्यवहार केल्याप्रकरणी विरोधकांनी सोमवारी विधिमंडळाचे कामकाज बंद पाडले होते. तसेच सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून या गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणीही विरोधकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान महसूलमंत्री विखे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना याचे खापर तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर फोडले आहे.

मात्र थोरात यांना दुखापत झाल्यामुळे ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे थोरात यांच्या वतीने काँग्रेस विधिमंडळ पक्षाने एका निवेदनाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, महसूल मंत्री असताना थोरात यांनी एक इंचही गायरान जमिनीचे वाटप केलेले नाही. महसूल विभागात मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यामध्ये विषय वाटप केलेले असते. त्यानुसार तत्कालीन राज्यमंत्री यांच्याकडे अमरावती विभागाची जबाबदारी होती.

भाजप-सेना युती सरकारच्या २०१४ ते २०१९ काळात चंद्रकांत पाटील महसूल मंत्री असतानाही अमरावती विभागाची जबाबदारी राज्यमंत्र्यांकडेच होती. महसूल विभागातील अर्धन्यायिक प्रकरणे चालवण्याची जबाबदारी राज्यमंत्र्यांची होती. शिवाय या प्रकरणामध्ये देण्यात येणाऱ्या निकालाची जबाबदारी ही वैयक्तिक असते. त्यांनी दिलेले निकाल मंजुरीसाठी महसूलमंत्र्यांकडे येत नाहीत. त्यामुळे वाशिम येथे झालेल्या गायरान जमिनीच्या वाटपाशी तत्कालीन महसूलमंत्री थोरात यांचा कुठल्याही प्रकारे संबंध येत नाही.

खोटेनाटे आरोप करून सरकारची अब्रू वाचवण्याचा अयशस्वी प्रयत्न विखेंनी करून पाहिला, पण यातून त्यांचे अज्ञान जनतेसमोर आले असून त्यांच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या आहेत.

हेही वाचा: उपसरपंच पदाच्या निवडीसाठी इच्छुकांचे आतापासूनच लॉबिंग !