कापूस, कांद्याला भाव मिळेना; पपईला मात्र विक्रमी भाव | Papaya price


Last Updated on March 4, 2023 by Piyush

Papaya price : यंदा कापसाला चांगला भाव न मिळाल्याने चार महिन्यांपासून शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे, तर भावाअभावी शेतकऱ्यांना कांदा कवडीमोल भावाने विक्री करण्याची वेळ आली असताना, दुसरीकडे मात्र पपई उत्पादक शेतकऱ्यांना विक्रमी भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.

२०२०-२१ मध्ये पपईला चांगला भाव मिळाल्याने गेल्यावर्षी जिल्ह्यातील पपईच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली होती. मात्र, गेल्यावर्षी पपईला चांगला भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पपई शेतातच सडत होते. गेल्यावर्षी पपई उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

परिणाम म्हणून यंदा जिल्ह्यात पपईच्या लागवड क्षेत्रात घट झाली. केवळ जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यातच ही घट झाली. मात्र, बाजारात पपईची मागणी जास्त असताना आवक कमी आहे. त्यामुळे पपईच्या चांगली वाढ झाली आहे.

गेल्यावर्षी ३०० ते ४०० रुपये क्विंटल दर असलेले पपई यंदा १८०० ते दोन हजार रुपये क्विंटल दरापर्यंत गेले आहेत. किरकोळ बाजारात १५ ते २० रुपये किलो मिळणाऱ्या पपईला किलोसाठी ५० ते ६० रुपये माजावे लागत आहेत.

डिसेंबरमध्ये गेले होते दर २३०० पर्यंत

यंदा पपईच्या लागवड क्षेत्रात गेल्या वर्षांच्या तुलनेत १ ते २ हजार हेक्टरची घट झाली आहे. त्यात अतिवृष्टीमुळे पपईचे नुकसान झाले व व्हायरसमुळेदेखील पपईच्या उत्पादनावर परिणाम झाला. दरम्यान, डिसेंबर महिन्यात पपईचे दर २३०० रुपये प्रतिक्विटल दरापर्यंत पोहोचले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात हे दर १५०० वर आले होते, तर फेब्रुवारी महिन्यात पुन्हा वाढ झाली असून, दर १८०० ते २ हजारपर्यंत गेले आहेत.

आरोग्यासाठी पपई उपयोगी; त्यामुळे मागणीत वाढ । Papaya price

कोरोनानंतर नागरिक आता आरोग्याबाबत अधिक सजग झाले आहेत. त्यात आरोग्यासाठी पपई खूप लाभदायक असल्याने पपईची मागणीदेखील वाढली आहे. कच्ची पपई खाल्ल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण योग्य राहते. कच्ची पपई खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळतं. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनक्रिया सुधारते. पपई खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि सर्दी आणि फ्लूची समस्या दूर होते. वजनnघटविण्यास पपई लाभदायक आहे.

यंदा पपई लागवडक्षेत्रात घट झाली आहे. त्यातच पपईवर दोन महिन्यांपूर्वी येलो मोझॅक व्हायरसने पीक खराब झाले. त्यामुळे जी लागवड झाली आहे, त्यातही घट झाली आहे. मात्र, उत्पादन कमी व मागणी जास्त असल्याने पपईला चांगला भाव मिळत असून, यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फायदा होत आहे. – ज्ञानेश्वर चौधरी, आव्हाणे, पपई उत्पादक शेतकरी.

वाचा : आंध्र, तेलंगणा, तमिळनाडूत लागवड वाढल्यानेच पडला महाराष्ट्रातील कांद्याचा दर | Onion Rate