Last Updated on December 29, 2022 by Piyush
Rain Update : ढगाळ वातावरणामुळे राज्यात थंडी कमी झाली आहे. त्यामुळे राज्याच्या किमान तापमानात (Weather Update) वाढ झाली आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमान 15 अंश सेल्सिअसच्या पुढे वाढल्याने राज्यात थंडी कमी झाली आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्रावर गारठा कायम आहे.
राज्यात तापमानात चढ-उतार कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला आहे. ढगाळ वातावरणमुळे गारवा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
धुळ्याच्या कृषी महाविद्यालयात 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातील किमान तापमान 12 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान होते. दिवसा उन्हाचा तडाखा सुरूच आहे. राज्यातील सर्वाधिक तापमान सोलापूर येथे 34.8 अंश सेल्सिअस नोंदले गेले. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सतत 30 अंशांच्या पुढे राहिला.
वाचा : मूग, उडीद अन् ज्वारीला बाजारातही उतरती कळा; बाजारात सर्वाधिक खरेदी विक्री सोयाबीनचीच
नागालँड, मेघालय, उत्तर प्रदेश, पूर्व आसामच्या काही भागात थंडी आणि तुरळक भागात पाऊस पडेल. यावेळी देखील, हवामानाचे स्वरूप पाहता, IMD ने नवी दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान या भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पण, इथे हा ऑरेंज अलर्ट पावसामुळे नाही तर धुक्यामुळे देण्यात आला आहे. परिसरात कमी दृश्यमानता असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी हवामान विभागाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत.
24 ते 31 डिसेंबर या कालावधीत उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणच्या काही भागात गारठा जाणवण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. येत्या एक जानेवारीपासून राज्यात कडाक्याची थंडी पडेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. तसंच कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये यंदा थंडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वाचा : ऐकलं का, गीर गायीच्या दुधाला बाजारपेठेत ८० अन् तुपाला १८०० रुपये किलोचा दर !