Last updated on January 10th, 2022 at 12:41 pm
पंढरपूर: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी पंढरपुरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकत्यांमध्ये बाचाबाची झाली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण
याबाबत अधिक माहिती अशी की, भाजप अध्यात्मीक आघाडी प्रदेशाध्यक्ष हभप तुषार भोसले हे पंढरपुरात विठ्ठल मंदिरात दर्शनाला आले होते. भोसले यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. -शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केलेली होती. पंढरपुरात ते आल्याचे समजल्यानंतर मंदिर परिसरात एका कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भोसले -यांना खा. शरद पवार यांचे ‘लोक माझे सांगाती’ राजकीय आत्मकथा हे पुस्तक भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते पुस्तक भेट देण्यासाठी जात असताना भाजपपदाधिकाऱ्यांनी त्यांना अडविले. दरम्यान, भोसले यांच्या अंगावर बुक्का टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आले होते असा आरोप करीत, त्यांना आम्ही रोखल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सांगितले.
या प्रकारामुळे श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर परिसरात उपस्थित भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.भाजपचे १५ ते २० पदाधिकारी होते. त्यांनी घोषणाबाजी सुरू करीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. आम्हाला आंदोलन करायचे असते तर आम्ही आणखी कार्यकर्ते घेऊन गेलो असतो. पण आम्ही दर्शनासाठी गेलो होतो आणि गाडीत असलेले लोक माझे सांगाती’ हे पुस्तक आम्ही त्यांना देत होतो. यावेळी आम्हाला अडविण्याचा प्रयत्न होऊन, घोषणाबाजी करण्यात आल्याचे राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख म्हणाले, हभप तुषार भोसले यांनी राज्यभर मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने केली. राष्ट्रवादीच्या शहराच्या अध्यक्षांनी देशाच्या पंतप्रधानांवर टीका केली. तरी आम्ही मोठ्या मनाने याकडे दुर्लक्ष केले. जर कुणी वाईट करत असेल तर जशास तसे उत्तर देणे हे भाजप पदाधिकारी म्हणून आमचे काम असल्याचे देशमुख म्हणाले.
दरम्यान, वर्षांचा पहिलाच दिवस असल्याने विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविकही मंदिर परिसरात आले होते. नेमका सकाळच्या सत्रात हा राडा झाल्याने व्यापाऱ्यांसह भाविकही भांबावून गेले. मंदिरात बंदोबस्ताला असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचेही ऐकून घ्यायला हे कार्यकर्ते तयार नव्हते. उलट त्वेषाने एकमेकांच्या अंगावर धावून जात असल्यामुळे मंदिर परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. ज्या मंदिराच्या परिसरात टाळ मृदंगाचा आवाज घुमतो, त्याच मंदिराच्या परिसरात आज मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी होत असल्याने अनेक भाविकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. अशी राडेबाजी करायला मंदिराचा परिसर हा राजकीय आखाडा नसल्याच्या संतप्त भावनाही काही भाविकांनी व्यक्त केल्या.
भाजप-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांविरूध्द गुन्हा भाजपा
अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले हे शनिवारी (दि. १) दुपारी येथे श्री विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी आल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी अन् धराधरी, धक्काबुक्की झाली. याप्रकरणी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, किसान मोर्चाचे माऊली हळणवार, सुभाष मस्के व इतर अनोळखी इसम तसेच राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, सूरज पेंडाल आदींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कपील सोनकांबळे हे करीत आहेत.
जीव गेला तरी त्याच्या आयुष्याची नाही थांबली परवड