Pune : लागवड झाली; मात्र जुना कांदा बराखीतच


Last Updated on December 7, 2022 by Piyush

Pune agriculture news: जिल्ह्यात उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सध्या माळशेज पट्ट्यात जवळजवळ ६० टक्के कांदा लागवड झाली असून, उर्वरित लागवड लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, मागील वर्षीचा जुना कांदा अजूनही बराखीतच साठवून पडला आहे. दिवाळीनंतर कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळेल, या आशेवर असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. लाखो रुपये खर्च करून कांदा वाया जातोय की काय, अशी चिन्ह निर्माण झाली आहेत.

सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात कांदाबी टाकून रोपे तयार करावी लागतात. यावर्षी अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात शेतीची मशागत करून कांदा लागवड केली जाते. चार महिन्यानंतर कांदे काढले जातात. या उन्हाळी कांद्याची टिकवण क्षमता चांगली असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कांदाचाळीत मोठ्या प्रमाणात कांदा साठवून ठेवतात. या आशेवरच की बाजारभाव चांगला मिळेल व देनेदारी मिटून चार पैसे शिल्लक राहतील. परंतु तीन वर्षांपासून मनासारखा बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

ज्याप्रमाणे दोन पैसे मिळावेत, म्हणून शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला. त्याचप्रमाणे कांदा व्यापाऱ्यांनी दिवाळीनंतर कांद्याला २० ते २५ रुपये प्रतिकिलो बाजारावर झाल्याने काही शेतकऱ्यांकडून माल खरेदी केला. परंतु एक दोन दिवसातच कांद्याचा भाव १५ ते १८ रुपये प्रतिकिलो झाला. बाजारभाव सतत खाली येत असल्यामुळे तेजीचा भाव असताना शेतकऱ्यांचा फायदा करून देण्यासाठी कांदा खरेदी केला व अचानक भाव कोसळल्यामुळे व्यापाऱ्यांचे पैसे अडकलेच, पण शेतकऱ्यांचे पैसे देणे मुश्किल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर कांदा व्यापारीसुद्धा अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, अशी मागणी ओतूर मार्केटमधील व्यापारी व अडतदार करत आहेत. – रोहिदास शिंदे, कांदा व्यापारी, ओतूर अडतदार.

शेतमालाला हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी

प्रत्येक दुकानदार, कंपनी, साध्या पानटपरीवाल्यालाही त्याच्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार असतो. परंतु शेतकऱ्याला त्याने कष्ट करून पिकवलेल्या शेतमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार का दिला जात नाही. असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, असे म्हणतात. पण शेतकऱ्यावर आर्थिक संकटाबरोबर उपासमारीची वेळ येते की काय, अशी खंत उदापूरमधील शेतकरी जालिंदर शिंदे, देविदास शिंदे, राजू अमूप, मनोज चौधरी यांनी व्यक्त केली.

वाचा : यंदा उडीद, मुगाच्या उत्पादनातही प्रचंड घट