शिक्षक दाम्पत्याने फुलवली डाळिंब बाग; एक खोड लागवड पद्धतीमुळे 30 टन फळ परदेशात निर्यात


Last Updated on November 23, 2022 by Piyush

Success Story Farmer : सोलापूर जिल्ह्यात सांगोलासारख्या भागात तेल्याच्या प्रादुर्भावामुळे डाळिंबाच्या (Pomegranate) असंख्य बागा काढण्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, या दरम्यानच माढा तालुक्यातील शिंगेवाडीसारख्या छोट्याशा गावात शिक्षक दाम्पत्याने मोठ्या मेहनतीने बाग जोपासत लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. याची दखल घेऊन त्यांना तालुका स्तरावर कृषी विभागाचा कृषिनिष्ठ पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आला आहे.

त्यांनी स्वतःच्या शेतात दोन एकरांवर एक खोड पद्धतीची डाळिंब लागवड केली. विशेष करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मेहनत घेत लाखो रुपयांचे उत्पादन घेऊन डाळिंब बाग यशस्वी केली आहे. यंदाही त्यांच्या दोन एकरांत जवळपास ३० टन डाळिंब माल परदेशात निर्यातीसाठी तयार झाला आहे. त्यांना सध्या ११० ते १८० रुपये किलोच्या बाजार भावाप्रमाणे सुमारे ३० लाखांच्यावर उत्पन्न निघणार आहे. यामुळे आतापासूनच त्यांची डाळिंब बाग पाहण्यासाठी इतर शेतकरी वळले आहेत.

शिंगेवाडी (ता. माढा) येथील महेंद्र रामचंद्र पाटील व त्यांच्या पत्नी राणी पाटील हे व्यवसायाने १५ वर्षांपासून हायस्कूल शिक्षक आहेत. मात्र, त्यांना शेतीमध्येही विशेष रुची आहे. त्यामुळे त्यांनी वडिलोपार्जित दोन एकरांवर एक खोड पद्धतीची १० बाय ६ वर डाळिंब लागवड केली. एकरी ७५० अशी एकूण सुमारे १५०० झाडे दोन एकरांवर लावली.

महेंद्र पाटील व राणी पाटील हे दाम्पत्य स्वतः शेतात राबतात. विशेष करून राणी पाटील या शिक्षिका या बागेची निगरानी करत असताना स्वतः ट्रैक्टर चालवत फवारणीदेखील करतात. त्यांचा डाळिंब सध्या बांगलादेश, दुबई, कोलकाता व झारखंड येथे विक्रीसाठी निघाला आहे.

बागेत येतोय सूर्यप्रकाश

लागवडीपूर्वी बेड, नांगरणी, रोटरणी, ड्रीप, शेणखत, कंपोस्ट खत टाकणे अशा पद्धतीने तयारी केली. एक खोड पद्धतीने डाळिंब लागवड केल्यामुळे सूर्यप्रकाश हा १०० टक्के बागेत येऊ शकतो. त्यामुळे कोणत्याच रोगांना डाळिंब बळी पडत नसल्याचे महेंद्र पाटील यांचे म्हणणे आहे.

एक खोड डाळिंब लागवड पद्धतीमुळे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन निघत असून, त्यात लागवडीवेळी खोडाजवळ पॉलिस्टर नेटचा वापर केल्यानंतर वॉटर सुटही फुटत नाहीत. त्यामुळे मजुरी खर्च वाचतो. या पद्धतीने लागवड केल्यास सूर्यप्रकाश पूर्णता संपूर्ण बागेत जात असून, त्यामुळे रोगांना झाडे बळी जात नाहीत. ही अत्याधुनिक पद्धत शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. – प्रवीण माने, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शेतकरी.

वाचा : Animal feed : पशुखाद्याच्या दरात 30 टक्क्यांनी वाढ; दूध उत्पादकांना झटका