पांढरा कांदा लागवडीची लगबग! यंदा 300 रुपये किलो भाव मिळण्याचा अंदाज


Last Updated on December 12, 2022 by Piyush

अलिबाग : अलिबागचा प्रसिद्ध गुणकारी आणि औषधी सफेद कांद्याची लागवड करण्यात शेतकरी मश्गूल झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील नेहुली, खंडाळे, कार्ले, सोगाव, वेष्वी, पवेले, धोलपाडा, वाडगाव या गावात मोठ्या प्रमाणात सफेद कांद्याचे उत्पादन घेतले जाते. साधारण २५० हेक्टर जमिनीवर सफेद कांद्याची लागवड केली जाते. अलिबागच्या या कांद्याला बाजारात मोठी मागणी आहे.

पाच हजार टन उत्पादन

पांढरा कांदा हा अडीचशे हेक्टरवर लावला जातो. यातून दरवर्षी साधारण पाच हजार टन कांदा उत्पादन शेतकरी घेत असतात. कांद्याची माळ ही अडीचशे ते तीनशे रुपये किमतीने विकली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो.

सफेद कांद्याला जीआय मानांकन

अलिबागचा पांढरा कांदा हा गुणकारी आणि औषधी आहे. त्यामुळे त्याला ग्राहकांची मोठी मागणी असते. अलिबागचा कांदा म्हणून बाजारात बाहेरील जिल्ह्यातील कांदा विकला जाऊन ग्राहकांची फसवणूक केली जाते. यासाठी कृषी विभागाने अलिबागच्या कांद्याला ओळख मिळावी, यासाठी दापोली कृषी विद्यापीठमार्फत जीआय मानांकन प्रस्ताव केला होता. गेल्या वर्षी पांढया कांद्याला जीआय मानांकन मिळाले आहे. त्यामुळे अलिबागच्या कांद्याला स्वतःची ओळख मिळाली आहे.

पर्यटक आवर्जून नेतात कांदा

अलिबाग हे पर्यटन क्षेत्र आहे. त्यामुळे लाखो पर्यटक हे अलिबागला पर्यटनासाठी येत असतात. पांढरा कांदा उत्पादन हे साधारण फेब्रुवारी, मार्चपासून येण्यास सुरुवात होते. त्यामुळे येणारे पर्यटक आवर्जून पांढरा कांदा खरेदी करून नेत असतात.

पावसामुळे लागवड उशिरा

यंदा पावसाळा लांबल्याने भातकापणी उशिरा झाली. जमीन ओली असल्याने कांद्याची बी पेरणी काहीशी लांबली होती. त्यामुळे कांदा बी आता बहरली असल्याने वाफे करून शेतकऱ्यांनी पांढरा कांदा लागवड सुरु केली आहे.

कांद्याचे लागवड क्षेत्र वाढीचे कृषी विभागाचे प्रयत्न

पांढऱ्या कांद्याला बाजारात मोठी मागणी आहे. या कांद्याचे उत्पन्न फक्त अलिबागमध्येच घेतले जात आहे. त्यामुळे कांद्याचे लागवड क्षेत्र वाढीसाठी कृषी विभागातर्फे प्रयत्न सुरु आहेत.

अलिबागच्या कांद्याला मोठी मागणी आहे. जीआय मानांकनही कांद्याला मिळाले आहे. शेतकऱ्यांनी क्षेत्र वाढवून अधिक उत्पादन घेण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून कांद्याला अजून मागणी वाढेल. – उज्ज्वला बाणखेले, जिल्हा कृषी अधिकारी.

वाचा : टोमॅटोवर रस शोषून घेणाऱ्या किडीचे संकट! या उपायातून टाळता येऊ शकतो प्रादुर्भाव