Last updated on January 10th, 2022 at 02:50 pm
नाशिक : नाशिकची खाद्यसंस्कृती म्हटले की, डोळ्यापुढे पहिल्यांदा अवतरते ती तर्रीबाज मिसळच. कधीकाळी नाशिककरांच्या पोटाची क्षुधा भागविणाऱ्या मिसळच्या स्वादाचा निखारा मात्र थेट कोटांपर्यंत पोहोचला. सात वर्षांपूर्वी ओवारा निखारा मिसळ नावाने लोकप्रिय झालेल्या मिसळीला गावरान निखारा मिसळने टक्कर दिली अन् ‘निखारा’ या शब्दावरून हा वाद थेट कोर्टात गेला. अखेर कोर्टाने निखारा शब्द वापरण्याचे हक्क मूळ मालकाला देत या ‘निखाऱ्या’ची धग शांत केली.
नाशिकची मिसळ आता केवळ मिसळ राहिली नसून, ती एक संस्कृती झाली आहे. वीकेण्डला सर्वांचे भेटण्याचे ठिकाण म्हणजे मिसळ पार्टी. निवडणुकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून थकले की इथले पुढारी एकाच टेबलावर मिसळ पाववर ताव मारतात. इथले कलावंतही आठवड्यातून एकदा मिसळच्या टेबलावर थाप मारतात. अनेक साहित्यिक इथे आल्यावर खुलतात. इतकेच कशाला साधा मोबाइल घेतला, तरी मिसळ पार्टी रंगते. पार्टी तर केवळ निमित्त असते, खरी ओढ असते ती मिसळची. मिसळीचा फडशा पाडणारा प्रत्येक जण तृप्तीचा ढेकर दिल्याशिवाय थांबत नाही.
नाशिकच्या मिसळ परंपरेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. काळ जसा बदलत गेला, तसा मिसळीचा स्वाद आणि पद्धतीही बदलल्या. यातूनच पुढे आली निखाऱ्यांची मिसळ. मातीच्या मडक्यात एका छोट्या वाटीत निखारा ठेवून धग आणि धूर यांच्या मिश्रणाने तयार झालेली उसकेबाज मिसळ खव्वयांच्यापसंतीस उतरली.
सात वर्षांपूर्वी ओवारा निखारा मिसळ नावाने ती नाशिकमध्ये लोकप्रिय झाली. संशोधनाअंती आस्वाद मिळाल्याने निखारा मिसळीचा ट्रेड मार्कही घेण्यात आला. मात्र, याच पद्धतीने दुसऱ्या एका दुकानदाराने गावरान निखारा मिसळ सुरू केली आणि नाशकात निखाऱ्यांचा वाद पेटला. या निखाऱ्याची धग थेट कोर्टापर्यंत पोहोचली. निखारा शब्द काढून टाकावा, म्हणून तीन वर्षांपासून गावरान मिसळवाल्याचा हा लढा सुरू होता. अखेर कोर्टाने निखारा शब्द वापरण्याचे हक्क मूळ मालकाला दिले आहेत. त्यामुळे तुम्हीही अशी हटके पाककृती तयार केली असेल, तर ट्रेड मार्क घेऊन ठेवा. नाही तर निखारा मिसळीप्रमाणे स्वादासाठी तुम्हाला वादाचा सामना करावा लागू शकतो.
धक्कादायक! सरावानंतर २७ वर्षीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन