नेपाळचे पंतप्रधान देऊबा सलग सातव्यांदा विजयी


Last Updated on November 24, 2022 by Vaibhav

काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर दैऊबा यांनी डडलेधुरा मतदारसंघातून सलग सातव्यांदा दणदणीत विजय मिळवला आहे. देऊबा यांच्या नेतृत्वाखालील नेपाळी काँग्रेस पक्ष १३ जागा जिंकत निकालात आघाडीवर आहे. नेपाळच्या सार्वत्रिक व सात प्रांतीय विधानसभांसाठी गत रविवारी मतदान झाले होते. ही निवडणूक प्रामुख्याने भारत समर्थक देऊबा व चीनधार्जिणे असलेले माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या पक्षात असल्याने अंतिम निकालाकडे भारतासह सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सार्वत्रिक व प्रांतीय निवडणूक पार पडल्यानंतर सोमवारी मतमोजणीला सुरुवात करण्यात आली होती. काही मतदारसंघातील मोजणी पूर्ण झाली असून, देऊबा यांनी आपल्या पारंपरिक डडेलधुरा मतदारसंघातून २५, ३५४ मतांसह दणदणीत विजय मिळवला आहे. देऊबांचे ३१ वर्षीय प्रतिस्पर्धी व अपक्ष उमेदवार सागर ढकाल यांच्या झोळीत फक्त १,३०२ मते पडली. देऊबा हे आपल्या पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीत कधीही कोणत्याही संसदीय निवडणुकीत पराभूत झाले नाहीत. नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष देऊबा आता पाचव्यांदा पंतप्रधान पदावर आहेत. या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने विजयी पताका फडकवली, तर ते सहाव्यांदा या पदावर विराजमान होतील. सत्ताधारी नेपाळी काँग्रेसने आतापर्यंत प्रतिनिधी सभेच्या १३ जागांवर विजय मिळवला असून, ५४ जागांवर आघाडीवर आहे. माजी पंतप्रधान के. पी. ओली यांच्या विरोधी ‘सीपीएन-यूएमएल (कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-युनिफाइड मार्क्ससिस्ट-लेनिनिस्ट) ने आतापर्यंत तीन जागांवर विजय मिळवला आहे, तर ते ४५ जागांवर आघाडीवर आहेत. आतापर्यंत प्रतिनिधी सभेच्या २० जागांवरील निकाल घोषित करण्यात आला आहे.

नेपाळ संसदेच्या २७५ जागा आणि सात प्रांतीय विधानसभेच्या ५५० जागांवर निवडणूक होत आहे. संसदेच्या एकूण २७५ सदस्यांपैकी १६५ जणांची निवड थेट निवडणुकीच्या माध्यमातून होईल, तर उर्वरित ११० जणांची निवड ‘प्रमाणित निवडणूक प्रणाली’च्या माध्यमातून केली जाईल. प्रांतीय विधानसभेच्या एकूण ५५० सदस्यांपैकी ३३० जणांची थेट निवडणुकीतून, तर उर्वरित २२० जणांची निवड प्रमाणित निवडणूक प्रणालीद्वारे होईल.

वॉलमार्टमधील गोळीबारात ७ ठार

चेसापीक : अमेरिकेच्या व्हर्जिनिया येथील वॉलमार्टमधील गोळीबाराच्या घटनेत ७ जण ठार झाले. मृतांमध्ये हल्लेखोराचाही समावेश आहे. व्हर्जिनिया राज्यातील चेसापीक शहरातील वॉलमार्ट स्टोअरमध्ये मंगळवारी ही घटना घडली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, तोपर्यंत गोळीबार थांबला होता. गोळीबारात हल्लेखोरदेखील ठार झाला. त्याला ठार करण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला नसल्याची माहिती अधिकारी लियो कार्सिस्की यांनी दिली आहे. हेही वाचा: इस्रायलच्या राजधानीत दुहेरी बॉम्बस्फोट!