नाशिक: रेशन दुकानदारांचे आंदोलन


Last Updated on December 14, 2022 by Vaibhav

नाशिक: नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे स्वस्त धान्य दुकानात ई-पॉस मशीन फोडत दुकानदाराला शिवीगाळ केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी सोमवारी (दि. १२) काळ्या फिती लावून कामकाज केले. तसेच विभागीय आयुक्तालयातील पुरवठा उपआयुक्त प्रज्ञा बढे यांना निवेदन देण्यात आले.

तीन दिवसांपूर्वी जातेगाव येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ५७ येथे धान्य घेण्यास गेलेल्या लाभार्थी व त्याच्या बायकोने दुकानाचे संचालक सुभाष पवार यांना शिवीगाळ करीत ई-पॉस मशीन फोडले. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आबा राऊत याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा रास्तभाव दुकानदार संघटनेने या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि. १२) आंदोलन केले. जिल्ह्यातील सर्व दुकानदारांनी काळ्या फिती लावत लाभार्थ्यांना धान्य वितरण केले.

संघटनेकडून यावेळी रेशन दुकानदारांना सुरक्षा पुरवावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच ई-पॉस मशीनसाठी ५ जी नेटवर्क मिळावे. दर महिन्याला ३० किंवा ३१ तारखेपूर्वीच दुकानदारांना धान्याचा कोटा मिळावा. परवानाधारकांना वाहतूक व हमालीमुक्तीबाबत सूचना कराव्यात. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतील कमिशन महिन्याकाठी बँकखात्यात जमा व्हावे. कोरोना काळात मोफत धान्यासाठी ग्रास प्रणालीवर भरून घेतलेल्या चलनाच्या रकमेचा परतावा करावा. महागाईनुसार कमिशनमध्ये वाढ करावी.

आयएसओ प्रमाणपत्रासाठी सक्ती करू नये आदी मागण्या करण्यात आल्या. महाराष्ट्र फेडरेशनचे अध्यक्ष गणपत डोळसे पाटील व संघटनेचे – जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: केळी लावलीच नाही, त्यांनाही पीकविमा भरपाई!