Last updated on January 8th, 2022 at 11:15 pm
दिवसभरात पाच कोरोनामुक्त
नागपूर : जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. रविवारी दिवसभरात ९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर पाच जण बरे होऊन घरी परतले. ३१ डिसेंबर रोजी एवढ्याच बाधितांची नोंद झाली होती हे विशेष. रविवारी जिल्ह्यात पाच हजार ४८८ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये शहरात ३ हजार ५४५ व ग्रामीणमध्ये १ हजार ९४३ चाचण्यांचा समावेश आहे. यात शहरातून ७३, ग्रामीणमधून ९ व जिल्ह्याबाहेरील ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शहरातून पाच जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ०.०२ टक्क्यांनी घटून ९७.८७ टक्क्यांवर आले. एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. बाधितांच्या संख्येत होणारी वाढ आरोग्य विभागाच्या चिंतेत भर घालणारी आहे.
सव्वासहा महिन्यांनंतर सक्रिय रुग्णसंख्या चारशेपार :
जिल्ह्यात ज्या गतीने रुग्णसंख्या वाढ होत आहे त्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. कालपरवापर्यंत शंभरच्या घरात असलेली सक्रिय रुग्णसंख्या चारशेपार झाली आहे. सध्या शहरात ३५५, ग्रामीणमध्ये ३५ व जिल्ह्याबाहेरील १८ असे ४०६ सक्रिय रुग्ण आहेत. यापूर्वी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या २७ जून रोजी ४२६ होती. २ जानेवारी रोजी ती पुन्हा चारशेपार गेली.
ओमायक्रॉन अॅक्टिव्ह रुग्णसंख्या दोन :
ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन अलर्ट झाले होते. ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता विदेशातून येणाऱ्या प्रत्येकावर प्रशासनाची नजर आहे. विमानतळावर गाठून चाचणी करण्यात येत आहे. १२ डिसेंबर रोजी नागपुरात ‘ओमायक्रॉन’ चा पहिला रुग्ण आढळला. दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या नागरिकाचा रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आल्यावर नागरिकांत भीतीचे वातावरण होते. ३० डिसेंबरपर्यंत पाच जण ओमायक्रॉनबाधित आढळले. सुदैवाने प्रकृती ठीक झाल्याने त्यांना घरी पाठविले. सध्या एम्समध्ये ओमायक्रॉनचे दोन अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.