Last updated on January 10th, 2022 at 12:57 pm
भुसावळ शहरात चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची हत्या झाल्याची घटना शहरातील न्यू पोर्टल चाळ भागात दि. २९ रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेवरून शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन तासात पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान फिरवीत आरोपीला जेरबंद केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील ७ नंबर पोलीस चौकीच्या मागे रात्रीच्या वेळेस महिलेचा खून झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे. शहरातील कवाडे नगर भागात राहणाऱ्या सुचिता ओमप्रकाश खरे (वय २७) या महिलेचा रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून मर्डर केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ ठाण्याचे दिलीप भागवत, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे, सपोनि विनोदकुमर गोसावी, संदीप दुनगहू, गणेश धुमाळ अशांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दोन तासात आरोपी अटकेत शहरातील भिमवाडी झोपडपट्टी परिसरातील रहिवासी शुभम चंदन बारसे याचे पत्नी सुचिता बारसे यांच्या सोबत किरकोळ कारणावरून नेहमी वाद होत असत. तर सुचिता हिचे शुभम सोबत दुसरे लग्न झाले आहे. तिला पहिल्या पतीपासून एक चार वर्षाचा मुलगा आहे. या मुलाच्या सांभाळ करण्यावरून आरोपी शुभम व मयत सुचिता यांच्यात भांडण सुरू असल्याचे सुचिताचे वडील ओमप्रकाश खरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तसेच शुभम हा सुचिताच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यानेच तिची हत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी शुभम बारसे यास अटक केली आहे.
प्रेम संबंधातून सुचिताने केला दुसरा विवाह
मयत सुचिता आणि तिचा पती शुभम यांचे शिक्षण शहरातील एका शाळेत सोबत झाले आहे. शिक्षणा दरम्यान बारावीत असताना त्यांचे प्रेम संबंध जुळले. यावेळी सुचीताच्या वडीलांनी शुभमला विवाहासाठी घळ घातली होती. मात्र, शुभमने आपले शिक्षण सुरू असल्यामुळे लग्न करण्यास नकार दिला होता. तेव्हा सुचिताचे वडील ओमप्रकाश खरे यांनी तिचा विवाह दुसरीकडे लावून दिला. तिला दोन वर्षानंतर एक मुलगा झाला. मात्र यानंतर ती पतीला सोडून माहेरी राहण्यास आली. यादरम्यान तिने शुभमशी विवाह केला. विवाहानंतर दोघेही पोर्टल चाळीतील शुभमच्या घरी राहायला गेले. सुचीताला शुभम पासून दुसरा मुलगा झाला. यानंतर पहिल्या मुलाच्या सांभाळ करण्यावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. चार महिन्यांपूर्वीच दोघांमध्ये भांडण झाल्याचे सुचीताच्या वडिलांनी सांगितले. वादामुळे ती माहेरी गेली होती. मात्र २८ रोजी ती पुन्हा आपल्या सासरी परतली. तर दि. २९ रोजी साडेआठ वाजेच्या सुमारास तिच्या खुनाची बातमी समोर आली आहे.
रेल्वे उत्तर वार्ड बनतेय गुन्हेगारीचे केंद्र शहरातील रेल्वे उत्तर वार्डातील
अतिक्रमण हटविल्यानंतर त्या भागात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या वर्षभरात या भागात खुनाच्या चार घटना उघडकीस आल्याने परिसरातील रहिवाशांनी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ज्या हेतूसाठी अतिक्रमण काढले त्यास गती देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
चोरपावलांनी आलेल्या मृत्यूने चौघांना क्षणात गाठले