पहाटेचा गारवा, सकाळचे ऊन पिकांना हानिकारक


Last Updated on December 21, 2022 by Vaibhav

सोलापूर: उशिरापर्यंत पड़त राहिलेल्या पावसामुळे खरीप हंगाम तर नुकसानकारक गेलाच, शिवाय रब्बीची पेरणीही उशिराने करावी लागली. उशिराने केलेल्या रब्बी पिकांना थंडी व उन्हाने गाठले असून, पिके ताळ्यावर आणण्यासाठी फवारण्यांचा मारा करावा लागत आहे. पावसाने शेती पिकांचे गणित बदलते व बिघडतेही. कमी व उशिराने पाऊस पडला तसेच लवकर व जोराचा पाऊस पडत राहिला तरीही पिकांचे नुकसान होते.

यावर्षी जून महिन्यात जेमतेम पावसावर खरीप पेरण्या केल्या. मात्र, ऑगस्टनंतर असा काही पाऊस पडत गेला की पिके पाण्यातून शोधायची वेळ आली. ऑक्टोबर महिन्याच्या १७ तारखेपर्यंत पाऊस पडल्याने खरीप हंगाम म्हणावा तितका हाती लागला नाही. बहुतांशी शेतीत पाणी उशिरापर्यंत राहिल्याने रब्बीच्या पेरण्याही उशिराने कराव्या लागल्या. डिसेंबर महिन्याच्या १० ते १२ या कालावधीत पडलेल्या थंडीचा पिकांवर परिणाम झाला होता. त्यानंतर पहाटे गारवा व सकाळी पडणाऱ्या कडक उन्हाचा फटका पिकांना बसत आहे. पिके ताळ्यावर आणण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत असल्याचे सांगण्यात आले.

मागच्या वर्षी अन् याही वर्षी …

मागील वर्षी उशिराने काढणीस आलेल्या द्राक्षाची विक्रीच झाली नाही. अशी द्राक्ष तोडणीही करता आली नाही व शेतकऱ्यांनाही केली नाही. त्यामुळे यावर्षी माल कमी लागला आहे. काही बागांना तर मालच लागला नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्याना मागील व याही वर्षी फटका बसला आहे.

द्राक्षांवर परिणाम

ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर हिरवी घाटे पोखरणारी अळी पडते. उन्हामुळे गव्हाच्या लोंब्या लहान पडतात, त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होतो. अधिक गारवा पडला तर केळीत धूर करावा लागतो, जेणेकरून उष्णता तयार होईल. अधिक गारवा पडला तर पिकांच्या कोवळ्या पालवीवर अटॅक होतो. १२ अंशाच्या खाली तापमान आले तर द्राक्षांवर परिणाम होऊ शकतो, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.

उन्हाचा फटका

दिवस मावळतीला गेला की हवेत गारवा निर्माण होतो, तो वाढत जाऊन पहाटे अधिकच वाढलेला असतो. सूर्योदयानंतर हळूहळू उन्हाचा तडाखा वाढण्यास सुरुवात होते व ९ वाजता उन्हाची तीव्रता वाढलेली असते. पहाटेपासूनचा कडक गारठा व सकाळी ९ नंतरच्या चपापणाऱ्या उन्हाचा फटका पिकांना बसत आहे. जिल्ह्यातील दाक्ष पिकाला फटका बसू शकतो, असे महाराष्ट्र राज्य दाक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी सांगितले.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात डाळिंब प्रकल्प