मविआ, मराठा समाजाचे मोर्चे स्वाभिमान दाखवणारे!


Last Updated on December 20, 2022 by Vaibhav

मुंबई : शिवसेना (ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ‘महामोर्चा’ ऐवजी मराठा मोर्चाचा व्हिडीओ ट्विट केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले. मराठा मोर्चा, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह सर्वच स्तरांतून टीका होऊ लागली आहे. तर हा व्हिडीओ महाविकास आघाडीचा मोर्चाचा आहे, असे मी कुठे म्हटलेले नाही. मराठा समाजाचा आणि महाविकास आघाडीचा मोर्चा महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे होते, या मोर्चांनी महाराष्ट्राची ताकद दिल्लीला दाखवली आहे, अशा शब्दांत राऊत यांनी स्पष्टीकरण केले आहे.

शनिवार, १७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने राज्यपाल आणि भाजप नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात मुंबईत महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘नॅनो मोर्चा’ संबोधत या महामोर्चाची खिल्ली उडवली होती. सत्ताधाऱ्यांकडून झालेल्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी रविवारी मोर्चाचा एक व्हिडीओ ट्विट करत त्यावर, ‘देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी… हे वागणे बरे नाही…’ असे लिहिले होते. मात्र, हा मराठा क्रांती मोर्चाचा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात आला असून राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा: तोट्यातले साखर कारखाने सरकारच ताब्यात घेणार