कांद्याचा बाजारभाव वाढेना, शेतकरी अडचणीत


Last Updated on December 9, 2022 by Piyush

पुणे : सध्या कांद्याचा बाजारभाव अतिशय नीचांकी पातळीवर घसरल्याने बळीराजाच्या डोळ्यात याच कांद्याने पाणी आणले आहे. आजमितीला कांदा ८ ते १३ रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. बाजारभाव स्थिर आहेत. या बाजारभावाने शेतकरी वर्गाला केलेला खर्चदेखील मिळत नाही, असे शेतकरी वर्ग सांगत आहे. याशिवाय यंदा कांद्याची साठवणूक मोठ्या प्रमाणावर झालेली असल्याने

भविष्यात कांद्याचे भाव वाढतील की नाही, हे सांगता येत नाही. याबाबत शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली आहे. सध्या कांद्याचे बाजारभाव पडले असून, ८ ते १३ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. यामुळे कांद्याच्या पिशवीपासून शेतकऱ्यांना पाचशे ते सहाशे रुपये प्रतिपिशवी मिळत आहे.

मात्र यावर्षी कांद्याला भांडवली खर्च वजा जाता शेतकऱ्यांना काहीही शिल्लक राहत नसल्यामुळे इतके दिवस मेहनत करून पिकविलेला कांदा चाळीत ठेवून कवडीमोल बाजारभावाने विकावा लागत असल्याने बळीराजाच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले आहेत.

भांडवली खर्चही सुटत नसल्याने संकट

सध्या तरी कांद्याचे भाव गडगडलेले असून, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. भविष्यात कांद्याचे भाव वाढले नाहीत, तर पुढील वर्षाचे शेतकरी बांधवांचे आर्थिक गणित चुकणार आहे, हे निश्चित झाले आहे. सध्या जे शेतकरी कांदा विक्रीसाठी पाठवीत आहेत, त्यांचा झालेला भांडवली खर्च सुटावा म्हणून मात्र माल विकूनही हातात शून्य शिल्लक राहत असल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी आहे. कांद्याला भाव कमीत कमी सतरा ते वीस रुपये असला पाहिजे, जेणेकरून किमान भांडवली खर्च जाता थोडेफार पैसे शिल्लक राहतील; मात्र सध्या तरी कांदा शेतकऱ्यांना रडवितो आहे.

शेतकऱ्यांनी कांद्याला भाव नसल्याने मोठ्या प्रमाणावर बराकीत साठवून ठेवला होता; तर ज्यांनी कांद्याची लागवड कमी केली होती, ते विकत घेऊन खरेदी करून साठवून ठेवत होते. याचाच अर्थ असा की, भविष्यात कांद्याच्या मागणीप्रमाणे पुरवठा होऊन भविष्यात कांद्याचे बाजारभाव वाढतील, या आशेपोटी कांदा साठवून ठेवला होता.

नवीन कांदा हा दुसया राज्यातून बाजारात दाखल झाल्यामुळे जुन्या कांद्याची मागणी कमी झाली आहे. ग्राहकांकडून नवीन कांद्याला मागणी असते. परिणामी जुन्या कांदा दरात घसरण झाली असून, सध्या दर स्थिर राहण्याची शक्यता नाही. सध्या बाजारभाव कमी होण्याचे संकेत व्यापारी वर्गाच्या बोलण्यातून समजते.

वाचा : जनावरांच्या सामूहिक लसीकरणासाठी नवी योजना आणण्याची राज्य सरकारची तयारी