अनेकांना जडलाय ‘पीएडीएस’ | ‘अवतार’ चित्रपटाच्या सिक्वलनंतर काय होणार?


Last Updated on December 16, 2022 by Vaibhav

वॉशिंग्टन : चित्रपटाचा प्रभाव समाजजीवनावर होत असतो. प्रभाव हा बऱ्याचदा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. चिरकाल टिकणारे प्रभाव निर्माण करणारे चित्रपट क्वचितच तयार होतात. जेम्स कॅमरून या दिग्दर्शकाने तयार केलेल्या ‘अवतार’ सिनेमाने प्रभाव नव्हे तर आजार निर्माण केलाय. आजाराचा हा नवा अवतार म्हणजे पुन्हा निसर्गावतारात परतणे. महत्त्वाचे म्हणजे या अवतार आजारावर कुठलीही मात्रा अद्याप तयार झालेली नाही. तसेच या आजाराला अजूनही वैद्यक शास्त्राने ‘आजार’ म्हणून मान्यता दिलेली नाही.

जेम्स कॅमरूनचा ‘अवतार’ सिनेमा २००९ मध्ये झळकला. चित्रपटाने अनेक विक्रम मोडले. सध्या या चित्रपटाचा पुढचा भाग सिनेमागृहात झळकतोय. पहिल्या भागात मानवाने विशिष्ट धातूसाठी परग्रहवासीयांवर हल्ला करून त्यांच्या जगावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला. चित्रपटासाठी वापरलेल्या स्पेशल इफेक्ट्सने प्रेक्षकांवर गारुड केले. हा चित्रपट पाहणाऱ्यांपैकी अनेकांना दुसऱ्या दिवशीपासून भलत्याच आजाराने ग्रासले. अनेकांना सभोवतालचे जग मिथ्थ्या वाटू लागले. निसर्गाकडे जाण्याची ओढ वाटू लागली. जगत असलेले आयुष्य नीरस आणि अपुरे भासू लागले. काहींना नैराश्याने ग्रासले. थोडक्यात, काही प्रेक्षक जेम्स कॅमरूननी उभारलेल्या ‘पॅन्डोरा’नावाच्या जगातून परतलेच नाहीत. तिथल्या जमातीसोबतच मनाने राहू लागले. हळूहळू अनेकांनी आपल्या मनःस्थितीबद्दल उघडपणे बोलायला सुरुवात केली. ‘अवतार फोरम’ वर मनोभावना व्यक्त होऊ लागल्या. या आजाराने ग्रासलेले जवळजवळ हजारहून अधिक नागरिक पहिल्या प्रेक्षकाने व्यक्त केलेल्या भावनेसारख्याच भावना बाळगून असलेले आढळले. दिवसागणिक ही संख्या वाढू लागली. २०१० मध्ये या आजाराचे नामकरण ‘पोस्ट अवतार डिप्रेशन सिन्ड्रोम’ असे करण्यात आले. ‘अवतार’ च्या पहिल्या भागाने ‘पोस्ट अवतार AVATAR डिप्रेशन सिन्ड्रोम’ आजार तयार केला. शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या दुसऱ्या भागानंतर या रुग्णांची काय अवस्था होईल किंवा नवा चित्रपट नव्या आजाराला जन्माला घालेल की जुन्या आजारावर उपचार देईल हे लवकरच ठरणार आहे.

वैद्यकशास्त्राची मान्यता नाही

अनेक प्रेक्षकांच्या या भावना अतिशय खऱ्या नि त्यांना त्रास देणाऱ्या ठरल्या. असे असताना ‘पोस्ट अवतार डिप्रेशन सिन्ड्रोम’ याला आजाराच्या कक्षेत अद्याप वैद्यकशास्त्राने आणले नाही. २०१० पासून हा आजार फैलावला, परंतु अजूनपर्यंत कुणीही हा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीचा खटाटोप असल्याचा आरोप केला नाही.

काय होते प्रेक्षकाला ?

निसर्गापासून तुटल्याची भावना प्रेक्षकाला विषण्ण करते. त्याला स्वतः सोबत पृथ्वीच्या भवितव्याची चिंता सतावू लागते. अनेकांना एकटे राहावेसे वाटते. या आजाराला मान्यताच नसल्याने उपचाराचा प्रश्नच येत नाही, परंतु निसर्गाला वाचवण्यासाठीच्या मोहिमेत स्वतःला झोकून देणे आणि इतरांना सोबत घेणे हा त्यावर उपाय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: बाळूमामा फेम अभिनेता सुमीत पुसावळे विवाहबद्ध