नाशिक, मालेगाव : कोरोना संसर्गामुळे जगभरातील अर्थव्यवस्था कोलमडली. अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. कोरोनाच्या दोन लाटांचे सावट दूर झाल्यानंतर ओमिक्रॉनमुळे कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या सर्व गदारोळात देशभरात सातत्याने या ना त्या कारणाने मालेगावची चर्चा झाली. पहिल्या लाटेत कोरोना संसर्गाचा येथे उद्रेक झाला. यानंतर शहरवासियांनी या संसर्गाचा धिरोदात्तपणे मुकाबला केला. नाममात्र रुग्णसंख्या हा सर्वांचा औत्सुक्याचा विषय आहे.
मालेगाव मॅजिकची चर्चा सुरु असताना त्याचे शास्त्रीय संशोधन व्हावे, या हेतूने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु नॅशनल जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांच्या संकल्पनेतून संशोधन कार्य सुरु आहे. त्याचा निष्कर्ष येण्यासाठी वाव आहे. तथापि, शहरातील तज्ज्ञ डॉक्टर, सामान्य नागरीक व संसर्गाच्या कालावधीत उपचार करणारे संबंधित घटक तसेच रुग्ण या सर्वांशी चर्चा केल्यानंतर चाचण्यांचे अत्यल्प प्रमाण, चाचणी न करताच मिळणारे उपचार, ‘डरना मना है’ अज्ञानात सुख व काही प्रमाणात हर्ड इम्युनिटी (अॅण्टी बॉडी) विकसित झाली हेच ‘मालेगाव मॅजिक’ आहे.
आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सुरु झालेल्या संशोधन कार्यात शिक्षक, विद्यार्थी व अभ्यांग असे पाच जणांचे पथक अडीच हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी त्यांची रक्तचाचणी घेत आहे. याशिवाय सर्वेक्षणा दरम्यान नागरिकांची दिनचर्या, आहार विहार, लसीकरण, व्यसन, उपचार पध्दती, कोरोना रुग्ण आहात की नाही, कोराना काळात केलेल्या उपाययोजना आदी माहिती संकलीत केली जात आहे.
नव्याने तीन महिन्यानंतर पुन्हा याच पध्दतीने सर्वेक्षण झाल्यानंतर या संदर्भातील निष्कर्ष प्राप्त होतील. ते शासनाला सादर केले जातील. शहर पुर्व भागात लसीकरणाचे प्रमाणही अत्यल्प आहे. मुस्लीम बहुल असलेल्या या भागातील बोटावर मोजण्याइतके रुग्णच चाचणी करुन घेत आहेत. यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत रुग्ण आढळतच नाहीत. कोरोनाची भीती झुगारुन येथील नागरीक आपापल्या कामात व्यस्त झाले आहेत. कोरोना नियमांचे कोणीही पालन करताना दिसत नाही. पुर्व भागात मास्क तर जणू हद्दपारच झाला आहे. एकूणच येथे अज्ञातच सुख आहे. त्या बरोबरच डरना मना है ही प्रवृत्ती वाढीस लागली आहे.
शहरात पहिल्या लाटेत उद्रेक झाल्यानंतर दुसऱ्या लाटेचा समर्थपणे मुकाबला करताना स्थानिक तज्ज्ञ डॉक्टरांबरोबरच येथील जनरल प्रॅक्टीशनर, युनानी डॉक्टर, मोहल्ला क्लिनीक यांनी केलेले उपचार महत्वपूर्ण ठरले. कोरोना व उपचार करण्यात येथील डॉक्टर पारंगत झाले आहेत. राज्यभरातून आलेले रुग्ण येथे उपचार करुन ठणठणीत बरे होऊन गेले आहेत. यापूर्वी शहरात दोन सर्वेक्षण पार पडले. त्यावेळी लोकसंख्येच्या प्रमाणात हर्ड इम्युनिटी विकसीत झाले नसल्याचे आढळून आले. मात्र, काही प्रमाणात नागरीक समर्थ झाले आहेत. नियमांचे उल्लंघन होत असले तरी आपापल्या परीने घरगुती उपचार, उपाययोजना व विविध उपचारांचा जुगाड सुरुच आहे.
प्रत्येकाच्या शरीरात दोन प्रकारे अँटीबॉडी “र होतात. एक कोराना झाला की अँटीबॉडी तयार होतात व जातात. दुसरा प्रकार टी- सेल इम्युनिटी आहे की काय हा आहे. यापूर्वी शहरात दोन वेळा सर्वेक्षण झाले. दुसऱ्या सर्वेक्षणात आरोग्य विभागाने पाच हजार जणांचे सर्वेक्षण केले. लोकसंख्येच्या प्रमाणात ७० टक्के अँटीबॉडी मिळाल्या तर हर्ड इम्युनिटी असे म्हणता येते. मात्र तसे प्रत्यक्ष आढळून आले नाही. गेली दोन महिने रुग्णसंख्या अत्यल्प होती. गेल्या आठवड्यापासून शहरात ४० ते ५० व ग्रामीण भागात २० ते २५ रुग्ण आढळून येत आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. – डॉ. हितेश महाले, वैद्यकीय अधिक्षक, सामान्य रुग्णालय, मालेगाव
शहरात पहिल्या लाटेत उद्रेक झाला. दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग वाढल्यानंतर रुग्णांना तातडीने उपचार मिळाले. आरोग्य व उपचाराबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली. या काळात शहरासह परिसरातील तज्ज्ञ डॉक्टरांबरोबरच जनरल प्रॅक्टीशनर व युनानी डॉक्टरही कोरोनावरील उपचाराबाबत पारंगत झाले. भीती दूर झाली. यातूनच पीपीई कीट न वापरताही डॉक्टर उपचार करु लागले. रक्त चाचणी, सीटी स्कॅन व आरटीपीसीआर यासह कुठल्याही चाचण्या न करताच उपचार घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. दुसऱ्या लाटेत मी स्वतः शेकडो रुग्णांची सीटी स्कॅन व आरटीपीसीआर चाचण्या केल्या. – डॉ. सचिन ठाकरे, कार्डिओलॉजीस्ट, – चैतन्य डायग्नोस्टीक, मालेगाव
एकही डोस न घेणे पडतेय महागात; आयसीयूमध्ये दाखल असलेले ५० टक्के रुग्ण एकही डोस न घेतलेले