मालेगाव : गेल्या शनिवारी (दि. ८) शहरालगतच्या म्हाळदे शिवारात जमिनीच्या कब्जा वादातून माजी महापौर अब्दुल मलीक व माजी नगरसेवक खलील शेख यांच्यात धक्काबुक्की होऊन गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेला शहर परिसरातील जमीन खरेदी विक्रीच्या वर्चस्व वादाची किनार असल्याचे समोर आले आहे.
शेत जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणी माजी महापौर अब्दुल मलीक इसा यांच्यासह अन्य तिघांना पवारवाडी पोलिसांनी अटक केली आहे. चौघा संशयितांना गेल्या रविवारी (दि. ९) दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात दोन परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार पोलिसांनी एका गुन्ह्यात माजी महापौर अब्दुल मलीक यांना अटक केली आहे, तर दुसऱ्या गुन्ह्यात एहसान रमजान शेख, दीपक पवार, रवींद्र जोशी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी खलील शेख हे फरार झाले आहेत. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात माजी नगरसेवक प्रा. रिजवान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातही खलील शेख यांना अटक करण्यात आली होती. जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात शेख यांचा दबदबा आहे. तसेच राजकीय घराण्याशी संबंधित असल्याने त्यांचा या व्यवसायात जम बसला आहे. माजी महापौर अब्दुल मलीक यांनीही जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायाच्या वर्चस्ववादातूनच गोळीबारासारखी गंभीर घटना घडल्याचा अंदाज पोलीस यंत्रणेने व्यक्त केला आहे.
पोलीस अॅक्शन मोडवर
या घटनेमुळे उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशत व राजकीय ताकदीचे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. प्रारंभी गुन्हे दाखल होण्यापूर्वी तडजोड केली जात होती. मात्र, पोलिसांनी अॅक्शन मोडवर येत गुन्हा दाखल केला आहे. आता संबंधितांविरुद्ध काय कारवाई होते याकडे शहराचे लक्ष लागून आहे.
पुणे हादरले! भाडे दिले नाही म्हणून रिक्षाचालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार