महाड : खाडीपट्ट्यातील आदिसते ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ मीनाक्षी मनोहर खिडविडे यांच्या काल दुपारी झालेल्या अज्ञातांकडून क्रूर हत्येच्या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी तातडीने केलेल्या कडक कारवाईमध्ये सात संशयितांना ताब्यात घेतले असून यापैकी यासंबंधात कोणत्याही क्षणी संबंधितांना अटक होण्याची शक्यता पोलिस सुत्रांकडून वर्तविण्यात येत आहे दरम्यान चोवीस तासांपूर्वी झालेल्या या हत्येच्या संदर्भात महाड माणगाव रोहा श्रीवर्धन येथील प्रमुख पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बारा पोलिसांची पथके या हत्येबाबत तपास करीत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिली आहे.
या घटनेची माहिती समजताच मुंबई येथे विधानसभेत असलेल्या रायगडचा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रात्री तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन येथे असलेल्या पोलिस अधिकारी व ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांशी पुढील कार्यवाहीबाबत तातडीने सूचना दिल्या.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मीनाक्षी खिडविडे यांचा मृतदेह शवविच्छेदन व पुढील तपासणी कामी जेजे रुग्णालय मुंबई येथे सोमवारी रात्री उशीरा हा मृतदेह पाठविण्यात आला. हिवाळी अधिवेशनामध्ये व्यस्त असलेल्या महाडचे आमदार भरत गोगावले यांनीही परिस्थितीचे गंभीरता ओळखून रात्री उशिरा या गावातील घटनास्थळाला भेट देऊन संबंधितांच्या नातेवाईकांची भेट घेऊन आरोपींना तातडीने गजाआड करण्याकरिता आपण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे स्पष्ट केले.
सोमवारी दुपारी उशिरा सरपंच मीनाक्षी खिडविडे या आपल्या घरालगत असलेल्या रानामध्ये सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी त्या परिसरातून येणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर तालुका पोलीस स्टेशनमध्ये माहिती प्राप्त होताच तालुका पोलिसानी तातडीने कार्यवाही करून पोलिस उपविभागीय अधिकारी नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाला भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला.
रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दधे यांनीही घटनास्थळी भेट देऊन या संदर्भात सुरू असलेल्या तपासात अधिक मूल्यवान सूचना देत बारा पथकांची विविध ठिकाणांकरिता नेमणूक करून या घडलेल्या घटनेचा तपास अल्पावधीत पूर्ण करण्याचे संकेत दिले. मंगळवारी सकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे याविषयी विचारणा केली असता त्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन झाले असून त्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त होण्यास थोडा कालावधी लागेल असे स्पष्ट करून मृतदेह अंतिम संस्कारासाठी गावाला पाठविण्यात येत असल्याची माहिती दिली.
या गावाच्या परिसरात भेलोशी गावच्या जिल्ह्यामध्ये सुमारे चौदा ते पंधरा वर्षांपूर्वी दोन युवकांची गळा कापून हत्या करण्यात आली होती. याची आठवण सोमवारी झालेल्या सरपंचांच्या हत्येनंतर खाडीपट्ट्यासह तालुक्यातील नागरिकांना स्मरण देऊन गेली. या हत्येचा तपास आजपावेतो लागला नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
संशयितांची बारा तासांच्या आत करण्यात आलेली कारवाई स्थानिक ग्रामस्थांना दिलासा देणारी ठरली आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी झालेल्या सरपंचपदाच्या थेट निवडणुकीत मीनाक्षी खिडबिडे यांचा विजय झाला होता. महाड तालुक्यात अशा क्रूर पद्धतीने झालेल्या घटनेने वीर गावांमधील झालेल्या शालेय मुलीच्या हत्येची देखील नागरिक आठवण करीत आहेत.
रायगडचे पालकमंत्री ना अदिती तटकरे यांनी महाड तालुक्यातील घडलेल्या दुर्दैवी प्रसंगाची माहिती मिळताच महाडला घेतलेली धाव देखील महाडकर नागरिकांना भावून गेले असल्याची प्रतिक्रिया महाडकर नागरिक व्यक्त करीत आहेत. रात्री साडेदहा ते दीड वाजेपर्यंत पालकमंत्र्यांनी ग्रामीण रुग्णालयात थांबून येथे डॉक्टर व पोलीस यंत्रणांजवळ घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पश्चात करावयाच्या विविध कार्यवाहीची चर्चा करून निर्णय घेतला.
एकूणच महाडच्या इतिहासातील या दुर्दैवी अशा पध्दतीच्या हत्येसंदर्भात पोलीस यंत्रणांनी केलेली सुरुवात ही सकारात्मक मानण्यात येत असून कोणत्याही क्षणी प्रमुख आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलीस यंत्रणा यशस्वी होईल असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
आई-वडिलाचं न ऐकल्याने वयाच्या अवघ्या 14-15 व्या वर्षी गमवावा लागला जीव