Onion Crop : कांद्याचे दर कोमात, तरीही लागवड जोमात..! नेमके कारण काय?


Last Updated on November 26, 2022 by Piyush

पुणे : नाशिक, पुणे जिल्ह्यात कांदा लावण्याची (Onion cultivation) लगबग सुरू झाली आहे. कांदा हे नगदी पीक आहे. ते वर्षातून तीनदा घेता येते. खरिपात (Rabi Season) पावसाळी, लेट खरीप हंगामात हा लाल कांदा व उन्हाळ भगवा कांदा असे कांद्याचे उत्पादन शेतकरी त्याच्या नियोजनाप्रमाणे घेत असतात.

कांदा पिकासाठी शेतकरी शेत राखून ठेवतात. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी बाजरीचे पीक घेतल्यानंतर खरीप हंगामातील लाल कांद्याची लागवड करतात. साधारणतः कांद्याचे बी ऑगस्ट किंवा सप्टेंबर गादी वाफ्यावर तयार करतात व नोव्हेंबर दुसऱ्या आठवड्यापासून कांद्याची लागवड करतात.

कांद्यासाठी वाफा पद्धतीचा उपयोग यांत्रिकी साधनांमुळे ट्रॅक्टरने शेती कामांना वेग येतो. अनेक शेतकरी प्रमाणित बियाणे वापरतात. परंतु, बियाणे खराब निघाल्यास जोड कांदे, डोंगळे निघणे, कांद्याची वाढ न होणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे उत्पादनात घट येते. यासाठी अनेक शेतकरी घरचे उत्कृष्ट बियाणे तयार करतात.

या कांद्यावर वातावरणाचा परिणाम झाल्यास कांद्याच्या पातीवर रोग पडतो. कांद्यासाठी बहुतेक शेतकरी वाफा पद्धतीचा उपयोग करतात. तर उर्वरित खरिपातील वरंबा पद्धत व सिंचन पद्धतीचा ही उपयोग करतात. उठला तर हत्ती व पडला तर माती’ ही ग्रामीण भागात पूर्वापार प्रचलित म्हण आजही कांदा उत्पादकांच्या चिंतेचा व संघर्षाचा विषय आहे. अतिशय संवेदनशील नगदी पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते.

सध्या कांदा उत्पादक सर्व बाजूंनी अडचणीत सापडला असताना मजूर टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. कांदा लागवड करत असताना मजुरांची टंचाई भासत असल्यामुळे अनेक शेतकरी इतर गावांतून मजुरांची स्वखर्चाने ने-आण करतात. शेतकऱ्यांना वाहनांची सोय करावी लागते. अनेक गावांमध्ये मक्ता पद्धतीने कांदा लागवड केली जाते. त्यामुळे वेगवेगळ्या गावांचा दर वेगवेगळा असू शकतो. तर काही गावांमध्ये वाफ्यांवर दर ठरविला जातो.

कांदा उत्पादकांना आता मजुरांच्या ‘वेटिंग लिस्ट’चा सामना करावा लागत असल्याने उत्पादक वैतागले आहेत. उचल रक्कम देऊन शेतकरी आपला नंबर कधी व कोणानंतर, यांच्या नोंदी ठेवत आहेत. कांद्याच्या रडकथेत आता कामगार तुटवडा आणि वेटिंग लिस्टचा अभूतपूर्व अनुभव घ्यावा लागत आहे.

कांदा पिकाच्या आर्थिक उलाढाल, भरवशावर मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, आरोग्य खर्चासह कर्ज परतफेड, वाहन खरेदी, भक्कम निवास व्यवस्था, पाळीव प्राण्यांसाठी निवारा आदी गोष्टींचे नियोजन करण्याचे धाडस शेतकरी करू शकत नाही. कारण कांदा उत्पादक शेतकरी सर्व बाजूंनी अडचणीत सापडलेला आहे.

कांद्याची वास्तवस्थिती…..

कांदा रोप तयार करण्यापासून उत्पादकांची संघर्ष यात्रा सुरु होते. त्यातच रोपांची उगवणक्षमता, वाढीवर होणारा बदलत्या हवामानाचा परिणाम, मशागतीसाठी इंधन दरवाढीचा लागवडीवेळी गरजेपोटी अतिरिक्त भार, मजुरांची कमतरता, लागवडीच्या दरात वारंवार होणारी वाढ या समस्या नेहमीच भेडसावतात.

विजेचे अनाकलनीय भारनियमन व त्याचा लागवडीवर होणारा परिणाम, लागवडीनंतर तणनाशकांची नैमित्तिक फवारणी, कीटकनाशकांमुळे पिकांवर होणारे दुष्परिणाम, खतांचे सतत वाढते दर व कृत्रिम टंचाईची समस्या, बिगर मोसमी पाऊस, गारपीट अतिवृष्टी या नैसर्गिक संकटाची धास्ती या प्रश्नांनाही शेतकऱ्याला सामोरे जावे लागते.

काढणीनंतर अपेक्षित बाजार भावाची अनिश्चित स्थिती, निश्चित उत्पन्न व नफ्याचे न जुळणारे गणित, साठवणुकीसाठी लाखोंचा खर्च, साठवलेला माल खराब होण्याची भीती, अशा एक ना अनेक समस्यांना तोंड देत कांदा उत्पादक वर्षानुवर्षे हा संघर्ष जगत आला आहे.

वाचा : नेहमी सरळ चालणाऱ्या मेंढ्यांचा कळप अचानक गोल-गोल फिरु लागला, गुढ उकलेना, शास्त्रज्ञांची झोप उडाली