कांद्याची आवक कमी; भावही गडगडले! कोंडी कधी आणि कशी फुटणार ?


Last Updated on November 25, 2022 by Piyush

जळगाव: कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून बाजारपेठेत कांद्याचे भाव कमी झाल्याने आवकही मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे.

चाळीसगाव बाजार समितीत शुक्रवारी कांद्याची ५०० क्विंटल आवक झाली तर १२०० रुपयांचा भाव होता. दिवसेंदिवस कांद्याची बाजार समितीतील आवक कमी होत चालली असताना भावही कमी मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

चाळीसगाव बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी ५०० क्विंटल, गुरुवारी ४०० क्विंटल व बुधवारी ६०० क्विंटल कांद्याची आवक झाली तर अनुक्रमे १२०० रुपये, १४७० रुपये व १२०० रुपये प्रति क्विंटल कांदा विकला गेला.

परतीच्या पावसामुळे नवीन लाल कांदा बाजारात येणार आहे. त्यामुळे आधी साठवण केलेल्या कांद्याला अधिक भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. दिवाळीनंतर मात्र बाजारात कांद्याचा भाव वाढला होता. २००० ते २६०० रुपयांपर्यंत कांदा विकला गेला. मात्र काही दिवसानंतर चित्र बदलले.

भाव कमी होत गेला आणि त्या प्रमाणात आवकही घटली. दिवाळीनंतर तेजीत आलेल्या कांद्याच्या भावात गेल्या १५ दिवसांपासून हजार ते पंधराशे रुपयांनी घसरण झाली आहे. शुक्रवारी चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची ५०० क्विंटल आवक झाली तर कांद्याला १२०० रूपये भाव मिळाला. १५ दिवसांपूर्वी हा भाव २७०० रुपयांवर होता.

गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून साठवून ठेवलेला कांदा खराब होऊ लागल्याने तो बाजारात विक्रीसाठी आणण्याची शेतकरी घाई करत होते. मात्र ते दुसरीकडे शेतकऱ्यांचा कांदा अत्यंत कमी भावात विक्री होत आहे. बाजारात मात्र कांदा किलोला २० रुपयांवर विक्री होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, दिवाळीनंतर मागणी वाढल्याने कांदा बाजारात तेजी आली होती.

नवीन कांद्याची प्रतीक्षा

दिवाळीनंतर कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेने साठवून ठेवलेला जुना कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला. आता हा कांदा संपू लागला आहे. आता नवीन कांदा बाजारात येण्यास जानेवारी उजाडेल. नवीन कांदा येईपर्यंत किमान दोन महिने कांद्याची टंचाई जाणवणार आहे. गेल्या दोन दिवसांत तर कांद्याचा दर १२०० रुपये झाला आहे. या महिनाभरातच कांद्याची सुमारे १७०० रुपये घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकयांना भावातील दुसऱ्याचा मोठा फटका बसत आहे.

कोंडी कधी आणि कशी फुटणार ?

कांद्याची आवक व भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे अनेक 7 शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. एकतर हवामान साथ देत नाही. त्यात कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पावसाने पीक मातीमोल होते. जेव्हा पीक येते, तेव्हा भाव नसतो. आता तर माल असूनही त्याला भाव नाही. त्यामुळे जगायचे तरी कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

जुन्या कांद्याला मागणी कमी आहे आणि भावही कमी आहे. ग्राहक नवीन कांद्याला पसंती देतात. त्यामुळेच कांद्याचे भाव व विक्री मंदावली गेली आहे. |भविष्यात परिस्थिती सुधारेल. -सतीशराजे पाटील. उपसचिव, बाजार समिती, चाळीसगाव.

वाचा : दुबईतील जानी विश्वनाथन यांची राहीबाई यांच्या बीज बँकेला भेट