Last Updated on January 4, 2023 by Vaibhav
नाशिक : शहरात खासगी सावकारांचा सुळसुळाट झाला असून, एकाने नऊ लाखाच्या बदल्यात ५० लाखांची परतफेड केलेली असतानाही सावकाराकडून २० लाखांची मागणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उर्वरित रकमेची मागणी करताना संशयिताकडून शिवीगाळसह थेट जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने संबंधित व्यक्तीने पोलिसांत धाव घेतली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात विविध कलमांसह सावकारी नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय शंकरराव देशमुख (रा. रुंगटा एम्पोरिया, कर्मयोगीनगर, गोविंदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश पुजारी (रा. राजीवनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पुजारी यांनी २००७ मध्ये देशमुख यांच्याकडून दरमहा पाच टक्के व्याजदराने वेळोवेळी नऊ लाख रुपये हातउसनवार घेतले होते.
या मोबदल्यात दि. ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत संशयितास ५० लाख ९० हजारांची रक्कम अदा करण्यात आली. त्यातील सहा लाख रुपये संशयिताच्या सांगण्यावरून महावीर राजेंद्रकुमार यांच्या बँक खात्यात, तर उर्वरित रक्कम रोखीने संशयिताच्या हवाली करण्यात आलेली आहे. असे असताना संशयिताकडून २० लाख रुपयांची अतिरिक्त मागणी पुजारी यांच्याकडे होत आहे.
रक्कम वसुलीसाठी संशयिताकडून धाकदपटशा दाखविला जात असून, वेळीअवेळी फोनवरून शिवीगाळ करीत संशयित जीवे मारण्याची धमकी देत आहे. संशयिताने मुलीच्या फोनवर संपर्क साधून, अश्लील शिवीगाळ केल्याने पुजारी यांनी पोलिसांत धाव घेतली असून, निरीक्षक चंद्रकांत आहिरे तपास करीत आहेत.
शहरात खासगी सावकारीचा व्यवसाय जोरात असून, संशयितांकडून दमदाटी होत असल्याने अनेकांनी आपले जीवन संपविल्याच्या घटना ताज्या आहेत. बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
हेही वाचा: सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना कॉल केला तर भरावा लागेल दंड