…तर कांदा व्यापाऱ्यांचे परवाने होणार रद्द..! सहकार विभाग अॅक्शन मोडवर

नाशिक : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारणी केल्याच्या निषेधार्थ गेल्या दोन दिवसांपासून कांदा लिलाव बंद केल्याने जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांद्याचे व्यवहार ठप्प झाले आहेत. सलग तीन दिवस व्यवहार बंद ठेवल्यास कांदा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सहकार विभागाने घेतली असून, प्रसंगी व्यापाऱ्यांचे लायसन्सदेखील रद्द होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, बाजार समित्यांना याबाबतचे आदेश देण्यात आले असून, बाजार समिती व्यापाऱ्यांना नोटिसा बजाविणार आहे.

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के निर्यात मूल्य आकारल्याने जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा दिला असल्याने गेल्या दोन दिवसांपासून बाजार समितीचे कांदा लिलाव व्यवहार बंद झाले आहेत. लासलगाव या महत्त्वाच्या कांदा मार्केटमध्ये दोन दिवसांपासून व्यवहार ठप्प झाले आहेत. काही उपबाजारांमध्ये शेतकऱ्यांचे कांदा ट्रॅक्टर्स दाखल होत असून, त्यांचे व्यवहार मात्र क्लिअर केले जात आहेत. मात्र अजूनही व्यापाऱ्यांची बंदची भूमिका कायम असल्याने लिलाव पूर्णपणे बंद होण्याची शक्यता असल्याने आता सहकार खात्याने कारवाईला सुरुवात केली आहे.

बाजार समिती कायद्यानुसार सलग तीन दिवस लिलाव बंद ठेवता येणार नसल्याने व्यापाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. त्यानुसार सहकार विभागाने जिल्ह्यातील बाजार समितीला आदेश दिले आहेत. या बाजार समित्या उद्यापासून संबंधित व्यापाऱ्यांना नोटिसा बजाविण्याची शक्यता आहे. याशिवाय व्यापाऱ्यांचा असहकार कायम राहिल्यास बाजार समित्यांकडून तात्पुरती थेट खरेदीची प्रक्रियादेखील करण्याचा पर्याय आहे. त्यानुसारदेखील तयारी करण्याच्या सूचना सहकार विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियमानुसार लिलाव बंद करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यानुसार संबंधित व्यापायांचा परवाना देखील रद्द होऊ शकतो. या संदर्भातील आदेश कांदा लिलाव होणाच्या बाजार समित्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार बाजार समित्या पुढील प्रक्रिया पार पाडतील. – फय्याज मुलाणी, जिल्हा उपनिबंधक.

वाचा : म्हाडाची लॉटरी लागली, पण घराच्या चाव्या कधी मिळणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया । Mhada Lottery 2023

Leave a Comment