जळगावच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले उन्हाळी हंगामी तिळाचा वाण


Last Updated on November 26, 2022 by Piyush

जळगाव : येथील कृषी संशोधकांनी उन्हाळी हंगामासाठी तिळाचे नवे वाण यंदा विकसित केले आहे. ‘पूर्णा’ वाण उन्हाळी हंगामासाठी पहिलेच वाण ठरले असून खान्देशसह मराठवाड्यातील शेतजमीन या वाणाला पोषक ठरणार आहे.

याशिवाय महाराष्ट्रासह चार राज्यांतील कोरडवाहू जमिनीसाठी कापसाचा ‘फुले सातपुडा’ नावाने विकसित नवा वाण विकसित केला आहे. हा वाण महाराष्ट्रासह ओडिशा, गुजरात व मध्य प्रदेशातील कोरडवाहू जमिनीसाठी फायदेशीर ठरणार आहे.

येथील ममुराबाद शिवारातील महात्मा फुले कृषी संशोधन केंद्रात ‘पूर्णा’ विकसित केले आहे. प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. पाटील, डॉ. एस. डी. राजपूत, तुषार आर. पाटील, डॉ. गिरीश चौधरी या संशोधकांनी पूर्णा वाण विकसित केला आहे.

खान्देश आणि मराठवाड्यातील शेतजमिनीवर पूर्णा वाण उजवा ठरणार आहे. उन्हाळी हंगामासाठी आतापर्यंत तिळाचे वाण विकसित झालेला नव्हता. म्हणून या संशोधकांनी पुढाकार घेऊन या वाणाची निर्मिती केली आहे.

वाण ठरणार प्रभावी

जेएलखी ४०८-२ या शास्त्रीय नावाने या वाणावर संशोधन पूर्ण करण्यात आले. वाण विकसित होताच संशोधकांनी या वाणाला ‘फुले पूर्णा म्हणून सादर केले. हा वाण मराठवाडा आणि खान्देशातील उन्हाळी हंगामात लागवडीसाठी प्रसारित करण्यात येणार आहे. या वाणाच्या परिपक्यतेस ८४ ते ९० दिवस लागतात. हजार दाण्यांचे वजन ४ ग्रॅम एवढे भरते. यामध्ये तेलाचे प्रमाण ४९.०२ टक्के इतके आहे. या वाणाने उन्हाळी हंगामात सर्वाधिक उत्पन्न दिले असून प्रचलित वाणापेक्षा सरस ठरले आहे.

पर्णशक्ती सक्षम

या वाणाच्या लागवडीनंतर येणाऱ्या पानांवर ठिपके व पर्णगुच्छ असतात. ते रोगप्रतिकारक आहेत. पाने गुंडाळणारी अळी व फळ पोखरणारी अळीसाठी पूर्णा रोगप्रतिकारक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना औषधांच्या फवारणीचीही गरज भासणार नाही.

उन्हाळी हंगामासाठी फुले पूर्णा वाण महत्त्वाचे ठरणार आहे. मराठवाडा आणि खान्देशातील शेतकऱ्यांना नक्कीच या वाणाचा फायदा होईल. सहकारी संशोधकांनी केलेली मेहनत खरोखरच कौतुकास्पद आहे. -डॉ. एस. एस. पाटील, प्रमुख शास्त्रज्ञ, तेलबिया संशोधन विभाग, महात्मा फुले कृषी केंद्र, जळगाव.

वाचा : कांदा पुन्हा 14 रुपयांनी घसरला..! आज एपीएमसीमध्ये मिळतोय इतका रुपये दर