अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून भेटवस्तू देणे गुन्हाच


Last Updated on December 14, 2022 by Vaibhav

मुंबई : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला भेटवस्तू घेण्यास जबरदस्ती करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोक्सो न्यायालयाने चांगलाच दणका दिला. लैंगिक छळाच्या अशा विचित्र प्रकारात विशेष पोक्सो न्यायाधीश प्रिया बनकर यांनी आरोपीला लैंगिक छळवणुकीच्या आरोपाखाली दोषी ठरवत सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

डांगरी येथे राहणाऱ्या १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गाठून आरोपी तिला पेन लेलो, बुक लेलो, असे वारंवार म्हणत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. ती त्याला टाळत असताना आरोपीने पुन्हा मुलीला गाठले आणि तिला पुस्तक देऊ केले. त्यावेळीही मुलीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. आरोपीने वारंवार पाठलाग सुरू ठेवल्यामुळे मुलीने हा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. वडिलांनी जानेवारी २०१९ मध्ये डोंगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी आरोपी कादरी याला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या खटल्यावर विशेष पोक्सो न्यायाधीश प्रिया बनकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने आरोपीचा जबाब तसचे परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य मानून आरोपीला दोषी ठरवताना आरोपी कादरीच्या कृत्यातून निश्चितपणे त्याचा लैंगिक हेतू असल्याचे दिसून येते. त्याच हेतूने तो मुलीच्या मागे लागला व त्याने मुलीशी जवळीक साधण्यासाठी भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केला, असे निरीक्षणही न्यायालयाने आपल्या आदेशात नोंदवतान आरोपीला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

हेही वाचा: मुंबई बुडाली धुक्यात!