शेतकऱ्याचा नाद खुळा..! जिरेनियम शेतीतून मिळविले लाखो रुपयांचे उत्पन्न


Last Updated on December 2, 2022 by Piyush

Inspiring Stories from Innovative Farmer : औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील शेतकरी पारंपरिक शेती बाजूला ठेवून आधुनिक शेतीकडे वळले आहेत. येथील एका शेतकऱ्याने जिरेनियम या सुंगधी वनस्पतीची शेती करून या शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

गल्ले बोरगाव येथील गणेश खोसरे या शेतकऱ्याने यू-ट्यूबवर जिरेनियम या सुंगधी वनस्पतीच्या शेतीचा व्हिडीओ पाहिला. त्यानंतर त्यांना या शेतीबाबत उत्सुकता वाढली. त्यांनी अधिक माहिती मिळवत अहमदनगरमध्ये जिरेनियम शेतीचा एक प्लॅट पाहिला.

जिरेनियमचा प्लॅट आवडल्याने त्यांनी याबाबत अधिक माहिती घेतली. त्यानंतर जिरेनियमची लागवड करण्याचा निर्णय घेतला. जिरेनियमची लागवड करण्यासाठी गणेश खोसरे यांना लागवड, ड्रीप आणि खते यासाठी एकरी १ लाख रुपये खर्च आला. या पिकावर फवारणी करण्याचा खर्च येत नाही. प्राणीदेखील या वनस्पतीचे नुकसान करीत नसल्याचे खोसरे यांनी सांगितले.

पहिल्या वर्षी त्यांना या शेतीतून १ लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. दुसऱ्या वर्षी १ लाख ६० हजारांचे उत्पन्न मिळाले. तिसऱ्या वर्षी आता त्यांना जवळपास २ लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, असा त्यांचा अंदाज आहे. जशी या शेतीची देखभाल ठेवली जाईल, तसे जिरेनियमचे पीक उत्पन्न देते, असे शेतकरी खोसरे यांनी सांगितले.

तेलाचं काय होतं ?

जिरेनियमच्या तेलाचा वापर सुगंधी साबण, अगरबत्ती, अत्तर, परफ्यूम तयार करण्यासाठी केला जातो. शेतकऱ्यांनी गटाने एकत्रित येऊन उत्पादन घेतले तर शेतकऱ्यांना फायदा होतो. शेतकऱ्यांनी कंपन्यांशी लेखी करार केला पाहिजे.

हा प्रकल्प जर यशस्वी झाला तर तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर राबवता येईल. सुगंधी वस्तूंची मागणी पाहता जिरेनियम शेतीतून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा चांगला मार्ग उपलब्ध होऊ शकतो, अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी वैशाली पवार यांनी दिली.

मुंबईच्या कंपन्यांशी करार

खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील गणेश खोसरे यांनी जिरेनियम शेती केली आहे. या वनस्पतीच्या पानांपासून तेलाची निर्मिती करतात. मुंबई येथील कंपन्यांनी खोसरे यांच्याशी करार केला. त्यामुळे उत्पन्नाचा हमखास मार्ग खोसरे यांना उपलब्ध झाला आहे. लवकरच गणेश खोसरे हे त्यांच्या शेतात डिस्टिलेशन प्लॅट उभारणार असून, जवळपासच्या शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या जिरेनियमच्या पानांपासून तेल काढूनदेखील देण्याचे काम ते करणार आहेत.

वाचा : Latur Market: सोयाबीनची आवक अन् दर ‘जैसे थे’!