भारत-ऑस्ट्रेलिया आजपासून टी-२० मालिका


Last Updated on December 9, 2022 by Vaibhav

नवी मुंबई : द. आफ्रिकेत नववर्षाच्या पहिल्या महिन्यात होणाऱ्या ट्वेण्टी-२० विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून भारतीय संघ शुक्रवारपासून मैदानात उतरेल. बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरोधात भारतीय संघाची याद्वारे घरच्या मैदानात परीक्षा पाहण्यास मिळेल.

ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिका सुरू होण्याअगोदरच मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार यांना हटवण्यात आले, तर फलंदाज प्रशिक्षक म्हणून ऋषिकेश कानिटकर यांना निवडण्यात आले. फलंदाजीतील नव्या प्रशिक्षकांसोबत खेळाडूंना सरावात दोन दिवसही मिळाले नाही. अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून दूर राहणाऱ्या मॅग लॅनिंगच्या अनुपस्थितीत एलिसा हिलीकडे कांगारूच्या संघाचे नेतृत्व चालून आले आहे. क्रिकेटला रामराम ठोकणारी रशेल हेन्सच्या स्थानावर १९ वर्षीय फलंदाज फोबे लिचफील्डला संधी दिली जाऊ शकते. आयर्लंडकडून खेळलेल्या मात्र, आता ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या किम गार्थ व हीथर ग्राहम ही दुकली पदार्पण करू शकते.

स्मृती मंधाना सोबत शेफाली वर्मा डावाची सुरुवात करेल. आखूड टप्प्याचे चेंडू टोलवताना शेफाली अडचणीत येते आणि त्याचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज असतील. महिला चॅलेंजर करंडक स्पर्धेतील यशस्वी कामगिरीमुळे राष्ट्रीय संघात हर्लिन देओल व यास्तिका भाटिया यांचे पुनरागमन झाले आहे. तर, लेग स्पिनर व अष्टपैलू देविका वैद्यने आठ वर्षांनंतर ट्वेण्टी-२० संघात प्रवेश केला आहे. झुलन गोस्वामीच्या निवृत्तीनंतर वेगवान गोलंदाजीचा भार रेणुका ठाकुरच्या खांद्यावर येऊन पडला आहे. तिच्या सोबत युवा अंजली सरवनी चेंडू हाताळताना दिसेल.

भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, अंजली सरवनी, देविका वैद्य, एस. मेघना, ऋचा घोष, हर्लिन देओल.

ऑस्ट्रेलिया संघ : एलिसा हिली (कर्णधार), तहलिया मॅकग्रा (उपकर्णधार), डार्सी ब्राऊन, निकोला कॅरी, अॅश्ले गार्डनर, किम गार्थ, हिथर ग्राहम, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलना किंग, फोबे लिचफिल्ड, बेथ मुनी, एलिसा पेरी, M मेगन शूट आणि अ‍ॅनाबेल सदरलँड.