टोमॅटो शेतीत तीन लाख रुपये गुंतवून अवघे 13 हजारांचे उत्पन्न


Last Updated on December 6, 2022 by Piyush

तामलवाडी (जि. उस्मानाबाद): शेतीत पिकविलेल्या फळ भाज्यांना कधी भाव मिळतो तर कधी ढासळतो, हा अनुभव शेतकऱ्यांसाठी आता नवीन राहिलेला नाही. त्यामुळेच शेती व्यवसाय संकटात सापडत आहे. कुठल्याही व्यवसायात तोटा झाल्यास ‘लाखाचे बारा हजार झाले’, असे म्हटले जाते; परंतु तुळजापूर तालुक्यातील धोत्री येथील एका शेतकऱ्याला तीन लाखांची गुंतवणूक करून केवळ तेरा हजार रुपये पदरात पडल्यामुळे लाखाचे बारा नव्हे, तर चारच हजार झाले म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. बाजारात प्रति किलो केवळ पाच ते सहा रुपयांचा भाव मिळू लागल्याने टोमॅटो शेती धोक्यात आली आहे.

धोत्री शिवारात साठवण तलावामुळे सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे शेतकरी पालेभाज्या, वेल वर्गीय फळ भाज्यांचे उत्पादन घेण्याकडे वळला आहे. येथील माळरानावर दोडके, वांगे, कोहळा, टोमॅटो, पडवळ, मेथी, कोथिंबीर आदी उत्पादित केलेला भाजीपाला सोलापूर, पुणे येथे विक्रीसाठी पाठवला जातो. धोत्री शिवारात शिवाजी साठे यांनीही ३ एकर क्षेत्रात ठिबक सिंचनाचा आधार घेत टोमॅटो रोपाची लागवड सप्टेंबर महिन्यात केली होती.

रोपाचे संगोपनही उत्तम प्रकारे करून अतिवृष्टीच्या तडाख्यातून टोमॅटोची शेती जोपासली. मात्र, फळ धारणा होऊन उत्पादित केलेले टोमॅटो विक्रीसाठी बाजारात जाणार तोच बाजार भावात घसरण झाली. ३० ते ४० रुपये प्रति किलो मिळणारा भाव अचानक ५ ते ६ रुपयांवर येऊन ठेपला.

शिवाजी साठे यांनी तीन एकरातील टोमॅटो शेतीसाठी ३ लाखांचा खर्च केला. यात लागवड औषध फवारणी खते आदींचा समावेश आहे; परंतु आता बाजार भावात घसरण झाल्याने साठे यांना फक्त १३ हजारांचे उत्पादन पदरात पडले. त्यामुळे यातून लागवडीचा खर्च तरी पदरात पडतो की नाही, याचीही शाश्वती त्यांना राहिलेली नाही.

सप्टेंबर महिन्यात तीन एकरावर टोमॅटोची लागवड केली. यावर तीन लाख रुपयांचा खर्च केला. मात्र, बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे. लागवडीचा खर्चही पदरात पडतो की नाही, याचा भरवसा नाही. आता शिल्लक टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे. -शिवाजी साठे, शेतकरी, धोत्री.

वाचा : संत्रा झाडे तोडून मरणाचे रचणार सरण, मुख्यमंत्र्यांना निवेदन