Last updated on January 10th, 2022 at 02:56 pm
मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांचे आदेश
औरंगाबाद: ओमायक्रॉनसह कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील व्यक्तींनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही किंवा मुदत संपूनही दुसरा डोस घेतलेला नाही, अशा व्यक्तींना ५०० रुपयांचा दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गुरुवारपासून (दि. १५) नागरिक मित्र पथकाकडून शहरात ही दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सोमवारी काढले आहेत. कोरोनासह ओमायक्रॉन हा नवीन व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हटले आहे. त्यानुसार खबरदारी म्हणून लसीकरणावर भर देण्यात येत आहे. राज्य शासनाकडूनही जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांना शंभर टक्के लसीकरण करवून घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
एकाही नागरिकांकडून लस घेतली जात नसल्याने प्रशासनाला लसीकरणाचे उदिष्ट पूर्ण करणे अवघड झाले आहे. त्यामुळेच आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कोरोना लसीचा एकही डोस न घेता रस्त्यांवर फिरणाऱ्या तसेच लसीचा दुसरा डोस चुकविणाऱ्या नागरिकांना दंड करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जाहीर केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १५ डिसेंबरपासून मनपा हद्दीत करण्याचा निर्णय आज प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी घेतला आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत विनामास्क फिरणाऱ्या रस्त्यांवर थुंकणाऱ्या तसेच रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांना मनपाच्या नागरिक मित्र पथकांकडून दंड आकारण्यात येत होता. आता कोरोना लस न घेणाऱ्यांचा ही पथके शोध घेणार आहेत. त्यामुळे लसीचा एकही डोस न घेतलेल्यांना बुधवारपासून घराबाहेर पडणे अवघड होणार आहे. नागरिक मित्र पथकांच्या तावडीत सापडल्यास नागरिकांना थेट पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे.
डोस न घेणारे २ लाख ११ हजार
मनपाला नागरिकांच्या लसीकरणासाठी १० लाख ५५ हजार ६०० एवढे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत ८ लाख ४४ हजार नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. एकही डोस न घेतलेल्या नागरिकांची संख्या २ लाख ११ हजार इतकी आहे. त्यामुळे या नागरिकांना आता बुधवारपासून (दि. १५) घराबाहेर पडणे अवघड होणार आहे. तसेच असे नागरिक पथकाला आढळले तर त्यांना पाचशे रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
६७ हजार दुसऱ्या डोसविना
शहरात कोरोना लसीकरणाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पहिला डोस ८ लाख ४४ हजार ७७६ नागरिकांनी तर ४ लाख ७० हजार ७११ नागरिकांनी घेतला आहे. आतापर्यंत एकुण १३ लाख १५ हजार ४८७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. लसीकरणाची मुदत संपल्यानंतरही ६७ हजार नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही. नागरिकांनी पहिला आणि दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.
बाप रे! राज्यात दिवसभरात ओमिक्रॉनचे 7 नवे रुग्ण सापडले