आर्वीत पांढऱ्या सोन्याची सर्वाधिक उलाढाल! खाजगी व्यापाऱ्यांकडून जोरदार खरेदी


Last Updated on November 30, 2022 by Piyush

वर्धा : पांढरे सोने अशी कापसाची ओळख. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शेतकरी कपाशीचे उत्पादन घेतात. यंदा दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या घरी कापूस येण्यात सुरुवात होत विक्रीलाही सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ८ हजार ५२३.४७ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. इतकेच नव्हे तर कापसाची सर्वाधिक उलाढाल आर्वी बाजार समितीच्या माध्यमातून झाली आहे.

आर्वी बाजार समितीच्या नोंदणीकृत खासगी व्यापाऱ्यांनी आतापर्यंत २ हजार ५४५.५२ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या खरिपात जिल्ह्यात २ लाख २७ हजार ६२३ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १.३४ लाख हेक्टरवरील कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा

जिल्ह्यात सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नोंदणीकृत खासगी व्यापा- यांकडून कपाशीला प्रति क्विटल ९ हजार १०० रुपयांपर्यंत भाव दिला जात आहे. असे असले तरी कपाशीला प्रति क्विटल किमान दहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे अशी अपेक्षा जिल्ह्यातील कपाशी उत्पादकांना आहे. येत्या काळात नक्कीच भाव वाढ होईल, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांना आहे.

खरीप हंगामात २.२७ लाख हेक्टरवर झाली होती लागवड

यंदाच्या वर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकूण २ लाख २७ हजार ६२३ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. त्याबाबतची नोंदही कृषी विभागाने घेतली आहे; पण नैसर्गिक संकटामुळे यंदा जिल्हील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसल्याचे वास्तव आहे.

अतिवृष्टीने केले होत्याचे नव्हते

यंदाच्या वर्षी खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने दडी मारली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली; पण नंतर पावसाने जिल्ह्यातील आठही तालुक्यात आपला दमदार जोर कायम ठेवला. शिवाय जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आठही तालुक्यात वेळोवेळी अतिवृष्टी झाली. याच अतिवृष्टीच्या संकटामुळे तब्बल १ लाख ३४ हजार ३५७ हेक्टर- वरील उभ्या कपाशीचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले.

वाचा : तूरही शेतकऱ्यांना तारणार की नाही? दर घसरले, साडेसहा हजारांपेक्षा कमी