Last Updated on December 4, 2022 by Piyush
बीड : बालाघाट परिसरासह जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या दगडी ज्वारी पिकाला शासनाचे भौगोलिक मानांकन मिळावे म्हणून जिल्ह्यातील कृषी व जलक्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. ज्वारीला भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी नैसर्गिक संवर्धनासाठी काम करणाऱ्या हिंद संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन दिले असून, इतर संस्थांकडूनही पाठपुरावा सुरू झाला आहे.
महाराष्ट्रात आजही प्रमुख अन्नधान्य म्हणून ज्वारीचा वापर होतो. आरोग्यासाठी हे अन्न अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्नधान्यासोबतच जनावरांसाठी चारा म्हणून मोठ्या प्रमाणात होतो. बीडच्या दगडी ज्वारीचे गुण पाहता भौगोलिक मानांकन कधी मिळेल? याकडे लक्ष लागले आहे.
बीड जिल्हा कमी पर्जन्यमान असलेला आहे. त्यामुळे पोषक परिस्थिती राहिल्यास ज्वारीचा पेरा एकूण पेरणी क्षेत्राच्या ५५ ते ६० टक्के क्षेत्रावर होतो. हे पीक सेंद्रिय पद्धतीने मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
ज्वारी पिकाला भौगोलिक मानांकन मिळाल्यास येथील उद्योग, व्यवसायांना चालना मिळू शकेल. स्थलांतर कमी होऊन या पिकाला मोठी बाजारपेठ निर्माण होईल.
मानांकन मिळाल्यास दगडी ज्वारी पिकाचे उत्पादन वाढून मूल्यवृद्धी होईल आणि आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून लागलेला कलंक पुसण्यास मदत होऊ शकेल, असे मानले जात आहे.
नाव दगडी ज्वारी, गुणही भरपूर
स्थानिक वाण: दगडी ज्वारी वाण स्थानिक व पारंपरिक व फक्त बीड जिल्ह्यात असून वर्षानुवर्षे रब्बी हंगामामध्ये उत्पादन घेतले जाते. दरवर्षी उत्पादनातून घरचे बियाणे केले जाते.
पाणी कमी लागते : दगडी ज्वारीचे वाण अत्यल्प पाण्यावर येते. या पिकाला रासायनिक खताचा किंवा कीटकनाशक फवारणीचा वापर करण्याची आवश्यकता नाही.
पक्ष्यांचा त्रास कमी : दगडी ज्वारी वाणाचे कणीस घट्ट असून वाकड्या आकाराचे असते. त्यामुळे दाणे फस्त करणाऱ्या पक्ष्यांचा या वाणावर त्रासही कमी आहे.
उत्पादकता : इतर वाणांच्या तुलनेत दगडी ज्वारीची उत्पादकता चांगली व समाधानकारक आहे.
स्वाण्यासाठी उत्तम पर्याय : दगडी ज्वारीची चव, गोडी, पौष्टिकता आणि उत्पादकता पाहता इतर वाणांच्या तुलनेत हा खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
दगडी ज्वारीला मानांकन आवश्यक
सात वर्षापूर्वी जिल्ह्यात दगडी ज्वारीचे क्षेत्र जवळपास २ लाख ५० हजार हेक्टर होते. कालांतराने ते कमी होत गेले. सध्या ५० ते ६० हजार हेक्टरात उत्पादन घेतले जात आहे. दगडी ज्वारीला भौगोलिक मानांकन मिळाल्यास ज्वारीवर आधारित विविध उत्पादन, उद्योग, व्यवसायासाठी फायद्याचे ठरणार आहे. इतर भागातील ज्वारीच्या मानांकनाप्रमाणे दगडी ज्वारीला मानांकन मिळाल्यास दर चांगला मिळेल व उत्पादनही वाढेल. या ज्वारीची विविध वैशिष्ट्ये पाहता भौगोलिक मानांकन गरजेचे आहे. – रामेश्वर चांडक, कृषी तज्ज्ञ, बीड.
शेतकरी होतील सक्षम
शासन स्तरावर याची दखल घेऊन दगडी ज्वारी पिकास एक जिल्हा एक उत्पादनाचे भौगोलिक मानांकन मिळावे, अशी मागणी शासनाकडे केली आहे. शेतकरी आर्थिक सक्षम करण्यासाठी आणि जिल्ह्यात कृषीपूरक उद्योग उभे करण्यासाठी सर्व लोक प्रतिनिधी, सामाजिक संस्था, शेतकरी संघटना, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ज्वारी पिकास भौगोलिक मानांकन मिळावे म्हणून सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. • संजय शिंदे, सचिव, हेल्प इन्स्टिट्यूट फॉर नॅचरल डेव्हलपमेंट (हिंद) नेकनूर.
वाचा : शेतकऱ्याचा नाद खुळा..! जिरेनियम शेतीतून मिळविले लाखो रुपयांचे उत्पन्न