Last updated on January 10th, 2022 at 12:41 pm
कोठारी : बल्लारपूर तालुक्यातील बामणी या गावातील शेतकऱ्याला महावितरण कंपनीने कृषी मीटर न देताच अवाढव्य बिल हातात दिले व ते न भरल्यास कारवाई करण्याची धमकी दिली. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
बामणी गावातील नथू विठू साळवे या शेतकऱ्याने शेतीमध्ये कृषी पंप लावण्याकरिता महावितरण कंपनीकडे डिमांड भरून विद्युत मीटरची मागणी केली होती. डिमांड भरून एक वर्ष झाल्यानंतरही महावितरणने या शेतकऱ्याला विद्युत मीटर दिले नाही.
परंतु विद्युत मीटर न देता महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला ५८७३ रुपयाचे बिल दिले. व वीजबिल न भरल्यास कारवाईचा इशारा दिला. हा प्रकार वंचितचे नेते राजू झोडे यांना समजताच त्यांनी प्रशासनास शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा यासंबंधीचे निवेदन दिले. विद्युत मीटरसाठी डिमांड भरूनही कित्येक वर्षे विद्युत मीटर दिल्या जात नाही. शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊन त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचे काम महावितरण कंपनीचे अधिकारी करत आहेत. महाराष्ट्र शासन व प्रशासनाने विद्युत कंपनीच्या मनमानी कारभाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकरी व सर्वसामान्य लोकांच्या समस्या तत्काळ सोडवावेत अन्यथा वंचित बहुजन आघाडी एमएसईबी विद्युत कंपनीच्या चुकीच्या धोरणाविरोघात आंदोलन करणार असा इशारा राजू झोडे यांनी तहसीलदार बल्लारपूर यांना निवेदनाद्वारे दिला. यावेळी राजू झोडे, संपत कोरडे, दीपक नत्थू साळवे, वंदना तामगाडगे, जाकिर खान, नरेश डोंगरे आदी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
दूध उत्पादन मिळते विक्रमी, मात्र दर मिळतोय कमी