‘स्मार्ट कॉटन’ प्रकल्पातून शेतकरी होणार समृद्ध


Last Updated on December 14, 2022 by Piyush

पुलगाव (वर्धा) : राज्यात उच्च प्रतीच्या कापूस उत्पादनामध्ये विदर्भाचा पहिला क्रमांक लागतो. एकूण उत्पादित होणाऱ्या कापसापैकी ७८ टक्के वाटा विदर्भाचा आहे. कापूस उत्पादक पट्ट्यांमध्ये शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या एकाच कापसाच्या वाणाची लागवड करावी, जेणेकरून कापसाला निर्यातक्षम करण्यास मदत होईल तसेच आर्थिक लाभ होईल, यासाठी राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये ‘स्मार्ट कॉटन प्रकल्प राबविला जात असून, यातून शेतकरी समृद्ध होणार आहेत.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत राज्यातील १२ जिल्ह्यांमधील ३५ तालुक्यांत ‘स्मार्ट कॉटन प्रकल्प’ सुरू झाला आहे. ‘एक गाव, एक वाण’ हे ब्रीदवाक्य स्मार्ट कॉटनसाठी घोषित झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी, कारंजा, आष्टी या तीन तालुक्यांतील ४५ गावांमध्ये हा प्रकल्प राबविला जात आहे.

देवळी तालुक्यासाठी संत गजानन माउली जिनिंग प्रेसिंग पुलगाव, कारंजा तालुक्यासाठी विदर्भ कोट फायर, तर आष्टी तालुक्यासाठी एम. आर. जिनिंग तळेगाव यांची या प्रकल्पाकरिता निवड केली आहे. यात सहभागी असलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवून एकजिनसी कापसाची लागवड केली आहे. यामध्ये शेतकरी बचत गटांचा समावेश आहे.

हा प्रकल्प कॉटन फेडरेशन व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात आहे. प्रकल्पात सहभागी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या एकजिनसी कापसाची थेट विक्री न करता त्याचे रुईच्या गाठीत रूपांतर केले जाणार आहे. या गाठींची ऑनलाइन पद्धतीने विक्री केली जाणार असून, त्यातून मिळणारा पैसा शेतकऱ्यांना उत्पादनानुसार वितरित केला जाणार आहे. त्यामुळे मध्यस्थी असणारे व्यापारी, दलाल यांचे महत्त्व कमी होऊन शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

प्रकल्पाचे महत्त्व काय?

यामध्ये सर्वच घटकांतल्या शेतकऱ्यांना पुरेसे प्रतिनिधित्व दिले जाते. त्यानंतर कृषी विभागामार्फत कार्यशाळा घेऊन ‘एक गाव, एक वाण’ या अंतर्गत शेतकरी कार्यशाळेच्या माध्यमातून एकजिनसी कापसाची निवड करण्याकरिता प्रोसेस केली जाते. एका शेतकरी समूहासाठी लीड रिसोर्स पर्सन नेमला जातो व त्याला प्रशिक्षित केले जाते.

कापूस पेरणीपासून ते गाठी तयार होईपर्यंत सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवले जाईल व त्याची तपासणी केली जाईल. यामुळे चांगल्या प्रकारचा व स्वच्छ कापूस उत्पादित करून कापूस प्रक्रिया उद्योगाला उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर त्याचे गाठीत रूपांतर करून या मूल्यवर्धित कापसाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळेल. तसेच उरलेल्या सरकीलाही भाव मिळेल व त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होईल. यामुळे वस्त्रोद्योग कंपनीचा स्पिनिंगचा खर्च कमी होईल.

स्मार्ट कॉटन प्रकल्पात जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, जेणेकरून कापसाचे मूल्यवर्धित उत्पादन होण्यास तसेच आर्थिक विकास होण्यास मदत मिळेल. सहभागी शेतकरी व शेतकरी बचत गटांना एकजिनसी वाणामुळे उत्पादन वाढीस मार्गदर्शन मिळेल. – जयेश महाजन, नोडल अधिकारी, नागपूर.

वाचा : पश्चिम विदर्भात रब्बी हंगामात केवळ हरभऱ्याचाच बोलबाला