कापूस खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ


Last Updated on December 14, 2022 by Vaibhav

दिग्रस : बाजारात व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव पाडल्याने तालुक्यात कापसाची आवक मंदावली आहे. बाजारात शुकशुकाट आहे. कापसाचे भाव वाढवण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.खरीप हंगामात संततधार पाऊस आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून तीन वेळा पेरलेली पिके वाहून गेली. त्यामुळे कापसाचे उत्पन्न या वर्षी कमी प्रमाणात होण्याचा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील कापूस खरेदी केंद्र महिन्याभराच्या पूर्वीच सुरू झाले.

परंतु कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतीच्या लागवडीचा खर्च भरमसाट झाला असून, त्या तुलनेत कापसाला कापूस खरेदी केंद्रावर योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचा कापूस सध्या घरीच असल्याने खरेदी केंद्रावर शुकशुकाट दिसत आहे.आजघडीला महागाई गगणाला भिडली असताना कापसाचे उत्पन्न घेताना बी-बियाणे, खते, मजुरांची मजुरी या सर्व बाबींचा विचार कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडत नसल्याचा अनुभव आहे. उत्पन्न निघावयास सुरुवात झाली की नेमके भाव का कमी होतात, असा प्रश्न शेतकऱ्यांना संभ्रमात टाकत आहे.शेतीला लावलेला खर्चही निघत नसल्याने मोठ्या कष्टाने पिकवलेला कापूस योग्य भावाअभावी घरीच पडून असल्याने शेतकरी अडचणीत आहे.

या वर्षी योग्य भाव मिळत नसल्याने मुला मुलींचे लग्न कसे करायचे, कृषी केंद्राचे कर्ज व अन्य कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत शेतकरी आहे. शासनाने उत्पन्न खर्चाच्या दीडपट जर भाव दिला तर कापूस खरेदी केंद्रावर कापसाची आवक वाढेल. या बाबीचा विचार करून शासनाने कापसाचा एका क्विंटलला १० हजारांच्या वर भाव देण्याची मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.

दरवर्षी शंभर क्विंटलवर खरेदी, यंदा शून्य

दरवर्षी दिग्रसमध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत जिनिंगमध्ये शंभर ते सव्वाशे क्विटल खरेदी होत असते. परंतु या वर्षी जिनिंगमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे.

हेही वाचा: श्रीरामपुरात कांद्याचे भाव स्थिर