यंदा भाजीपाला उत्पादन घेण्याचे प्रमाणही वाढले
लातूर: शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ व परिसरात पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी उन्हाळी कांदा लागवडीकडे वळले आहेत, तसेच भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. गत खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची आशा तुरीच्या पिकावर होती. परंतु विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे हे पीक वाळून गेले आहे. सोयाबीन निघालेल्या जमिनीवर शेतकऱ्यांनी रब्बीतील हरभरा पिकाची पेरणी केली. परंतु हरभऱ्यावरही मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पाने पिवळी पडत आहेत. परिणामी, उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. परतीच्या पावसामुळे येरोळसह परिसरातील नागेवाडी, सुमठाणा, शेंद, तळेगाव, चामरगा, बोळेगाव, कारेवाडी आदी गावांतील विहिरी, बोअरला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी आता उन्हाळी कांदा लागवडीकडे वळले आहेत. नळेगाव, शिरूर अनंतपाळ, साकोळ व चाकूर येथील आठवडी बाजारात रोप विक्रीसाठी येत असल्याने शेतकरी ते खरेदी करून लागवड करीत असल्याचे दिसत आहे.
नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न…
यंदा खरिपाच्या कालावधीत अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनचे नुकसान झाले. तूरही बरशीजन्य रोगामुळे हातची गेली आहे. पेरणीसाठी बियाणेही नाही. खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी दोन एकर जमिनीवर उन्हाळी कांद्याची लागवड केली असल्याचे शेतकरी गुंडेराव चौसष्टे यांनी सांगितले.
खबरदार! कोरोनाची तिसरी लाट शिगेला, एका दिवसात आढळले 2 लाख 64 हजार नवीन रुग्ण