खर्च 10 पटीनं.. उत्पन्न वाढेना, 80 टक्के अँपल बोराच्या बागा काढल्या


Last Updated on December 7, 2022 by Piyush

सोलापूर : बोरे काढण्यासाठी मजूर मिळेनात… वाहतुकीचा खर्च परवडेना… निसर्ग साथ देईना… अशा परिस्थितीत बोरांचा भाव मात्र वाढलेला नाही. या कारणाने जिल्ह्यातील जवळपास ८० टक्के बोराच्या बागा काढून टाकल्या आहेत. पाच-सहा वर्षांपूर्वी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चार हजार पोत्यांची आवक असायची.

आता जेमतेम ४०० पोत्यांची म्हणजे साधारण २०० क्विंटल आवक आहे. त्यामुळे हळूहळू उंबरणी, चमेली बोराची आवक कमी होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर, सांगोला, माढा, करमाळा या तालुक्यातील बोराच्या बागा मोठ्या प्रमाणात होत्या. पाच-सहा वर्षांपूर्वी बोराची आवक मोठी होती. काढणीसाठी खर्च कमी, डिझेल दर कमी असल्यामुळे वाहतुकीचा खर्च परवडत होता.

त्यामुळे बाजारात बोराची आवक असायची. मागील दोन-तीन वर्षांत आवक घटली आहे. यंदा तरी काही ठिकाणी परतीच्या पावसाचा फटका बसलेला आहे. दिवाळीनंतर पाऊस थांबल्यामुळे काही भागातील बोराच्या बागा चांगल्या स्थितीत आहेत. मागील दहा दिवसांत सोलापूर बाजार समितीत आवक वाढली आहे. दररोज सरासरी २०० क्विंटल आवक आहे. ही आवक डिसेंबरअखेर आणि जानेवारीत वाढण्याची शक्यता आहे.

अँपल बोराची चकाकी…

बाजारात उंबराणी व चमेली बोराबरोबरच अॅपल बोराची आवक वाढली आहे. साधारण दररोज २०० पेटी अॅपल बोराची आवक आहे. अलीकडच्या काळातच अॅपल बोरे स्थानिक बाजारात दिसत आहे. अॅपल बोराला सरासरी २५ रुपयांपासून ते १४०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. उंबराणी बोराला २० रुपये, तर चमेलाला ३० रुपये दर आहे.

नेपाळहूनही व्यापारी बांधावर यायचे

मागील पाच-सहा वर्षांपूर्वी व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन माल खरेदी करीत होते. अरण, मोडनिंब भागात परराज्यातील व्यापारी येत होते. हरयायाला, दिल्लीहून व्यापारी येत होते. आता बागा कमी झाल्यामुळे व्यापारीही येत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

दरात वाढ नाही..

सोलापूर बाजार समितीत बोअर आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसामध्ये जात आहे. इतर फळांच्या तुलनेत बोराच्या दरात वाढ झालेली नाही. सरासरी २० ते ३० रुपये किलो दर आहे. मागील वर्षांपूर्वीही दर तोच होता. दर स्थिर आणि खर्चात १० ते १५ पटीने वाढ झाल्याने शेतकरी बागा काढून टाकत आहेत.

निसर्गातील बदलामुळे आणि वाढत्या खर्चामुळे बोराच्या बागा ठेवणे परवडत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बागा काढल्या आहेत. माझ्याकडे सध्या २ एकर बोराची बाग आहे. दुबार छाटणी करून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. पुणे, नवी मुंबई, सोलापूर, मोडनिंब, कुईवाडी मार्केटमध्ये बोरे पाठविण्यात येत आहेत. -;विठ्ठल पाटील, बोरे उत्पादक शेतकरी, अरण.

गेल्या दहा दिवसांपासून बोरची आवक सुरू झाली आहे. यापुढे आवक वाढेल. मात्र, अलीकडे दोन वर्षांत आवक कमीच आहे. त्यामुळे व्यापारीही कमी असतात. ज्या शेतकऱ्यांच्या घरातील लोक काम करतात. त्यांच्याकडे बागा राहिल्या आहेत. इतरांना आता बोरे पिकवणे परवडत नाही. -सईद बागवान, व्यापारी.

वाचा : हा आहे 4 ते 5 पट पैसे मिळवून देणारा व्यायसाय, छोट्या खोलीपासून करता येते सुरुवात