अडते अन खरेदीदारांच्या वादात शेतकऱ्यांचे सव्वाशे कोटी थकले

नांदेड : कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी असते. परंतु, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती आडते अन् खरेदीदारांच्या भांडणात बघ्याची भूमिका घेत असल्याने शेतकरी अडचणीत सापडत आहे. मागील दोन महिन्यांपासून खरेदीदारांनी पेमेंट न केल्याने आडत्यांकडे जवळपास सव्वाशे कोटी रुपये शेतकऱ्यांचे थकले आहेत. वारंवार मागणी करूनही पेमेंट होत नसल्याने गुरुवारी शेतकरी, आडत्यांनी बीट बंद पाडले होते.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजघडीला दररोज चार ते पाच हजार कट्टे हळदीची आवक होत आहे. म्हणजेच दोन ते अडीच हजार क्विंटलचे बीट दररोज होते. मागील साडेतीन महिन्यात तब्बल सव्वादोन लाख क्विंटल हळदीची आवक झाली आहे. गुरुवारी तब्बल १४ हजार ६०० रुपये सर्वाधिक भाव मिळाला. दरम्यान, मागील दोन महिन्यांपासून हळदीचे पेमेंट न मिळाल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांना आडत्यांना धारेवर धरले. खरेदीदारांकडूनच पेमेंट मिळत नसल्याने आडते पेमेंट करणार तरी कुठून, असा प्रश्न उपस्थित केला.

त्यानंतर हा वाद बाजार समितीच्या संचालक मंडळापर्यंत पोहोचला. दुपारपर्यंत हळदीचे बीट बंद होते. त्यानंतर सभापती संजय लहानकर यांच्या उपस्थितीत आडते, खरेदीदार आणि काही शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पुढील आठ दिवसांत थकलेले पेमेंट करण्याचे खरेदीदारांनी मान्य केले. तसेच यापुढे वीस ते तीस दिवसांत हळदीचे पेमेंट खरेदीदार हे आडत्यांना समितीच्या माध्यमातून चेकने देतील, असा निर्णय घेतला. यावेळी उपसभापती भुजंग पाटील, संचालक भगवानराव आलेगावकर, सदाशिव देशमुख, प्रल्हाद काकांडीकर, बालाजी भायेगावकर, प्रल्हाद इंगोले, नवनाथ दर्यापूरकर, परवाना शेठ उपस्थित होते.

असे थकले १३२ कोटी

सरासरी दररोज अडीच हजार क्विटल हळदीची आवक होत आहे. गुरुवारी सर्वाधिक १४ हजार ६०० रुपये भाव मिळाला. हा भाव कमी अधिक शेतकऱ्यांना मिळतो. परंतु, मागील काही दिवसांपासून सरासरी दहा ते बारा हजार रुपये प्रतिक्विटल भाव मिळत आहे.

२ दररोज सरासरी अडीच हजार क्विटल हळदीची खरेदी ग्राह्य धरली तर मागील दोन महिन्यात १ लाख २० क्विटल हळदीची खरेदी झाली आहे. त्याला दहा ते बारा हजार रुपये भाव मिळाला, असे गृहित धरून १३२ कोटी रुपयांचे पेमेंट थकल्याचा अंदाज आहे. सदर पेमेंट पुढील आठ दिवसांत केले जाईल, असे आश्वासन खरेदीदारांनी गुरुवारच्या बैठकीत दिले.

खरेदीदारांचा चालतोय मनमानी कारभार…

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नऊ खरेदीदार हळद खरेदी करतात. त्यांच्याकडून तब्बल दीडशे आडते अन् हजारो शेतकयांना वेठीस धरण्याचे काम जात आहे. नियमाने चोवीस तासात पेमेंट करणे गरजेचे आहे. परंतु खरेदीदार आडते यांच्यात समेट घडवून बाजार समितीच्या मध्यस्थीने २० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. मात्र, खरेदीदार ठरलेली वेळही पाळत नाहीत.

शेतकऱ्यांना शाप, आडत्यांच्या ‘मापात पाप’

हळदीचे कट्ट्याचे माप करत असताना आठशे, पाचशे ग्राम वजन तर धरलेच जात नाही. परंतु, नांदेडच्या मोंढ्यात तब्बल दोन ते तीन किलो वजन कमी पकडले जाते. कट्ट्यामागे दोन ते तीन किलो वजन कमी पडल्यास शेतकऱ्यांचे लाखो रुपये आडते अन व्यापायांच्या घशात जात आहेत. मापातील हे पाप थांबवून शेतकऱ्यांना मिळणारा हा शाप थांबवावा, अशी मागणी होत आहे.

गुरुवारी पेमेंटवरुन वाद झाला. परंतु, आडते खरेदीदारांची बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्यात आला. यापुढे २० ते ३० दिवसांत पेमेंट करण्याचा शब्द खरेदीदारांनी दिला आहे. – भुजंग डक, उपसभापती, कृउबा.

वाचा : ‘या’ इमारतीत घरांची खरेदी करू नका..! नवी मुंबई महापालिकेचे नागरिकांना आवाहन

Leave a Comment