शेतकऱ्याचा कापूस घरातच, बाजारात आवक घटली, जिनिंग उद्योगही थंडच!


Last Updated on December 6, 2022 by Piyush

बीड : गतवर्षी कापसाला ११ हजारांपर्यंत भाव मिळाल्याने यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली. अतिवृष्टीने काहीसा फटका दिला असला तरी चांगल्या पावसामुळे पीक बहरले, उत्पादनही अपेक्षेपेक्षा जास्त हाती लागले; परंतु बाजारात सध्या कापसाला ८ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपला कापूस अद्याप घरातच ठेवला आहे. बाजारात म्हणावी तशी आवक नसल्याने कापसावर आधारित जिनिंग प्रक्रिया उद्योगही सध्यातरी थंडच आहे.

यंदा ऑक्टोबरपासून कापूस खरेदी-विक्रीला सुरुवात झाली. सुरुवातीला १० हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला. जिनिंग व खासगी व्यापारी कापूस खरेदी करू लागले. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कापूस विक्रीला काढत स्वतःची आर्थिक गरज भागवली तर आणखी भाव वाढतील, या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला न आणता घरातच ठेवला आहे.

हेही वाचा: विदर्भात पहिला रेशीम बाजार सुरू झाला हो ! बडनेरात शुभारंभाला पाच लाखांची उलाढाल

११ ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची असली तरी भाववाढीची कोणतीही शक्यता सध्या नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या दरावर कापूस उठाव अवलंबून आहे. सध्या गुजरात व महाराष्ट्रात जवळपास सारखाच भाव असल्याचे ते म्हणाले.

दरात अशी चढ-उतार

ऑक्टोबरमध्ये कापसाला १० हजार ३०० रुपये भाव होता. त्यानंतर घसरण होऊन दर ९ हजार २०० रुपये झाले. त्यानंतर घसरण होत दर ८ हजार ७०० ते ८ हजार ८०० झाले. नंतर पुन्हा तेजी आल्याने ९ हजार ते ९ हजार २०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. त्यानंतर चालू महिन्यात ५ डिसेंबरपर्यंत ८४०० ते ८ हजार ७०० पर्यंत भाव होता परंतु शेतकरी अजूनही थांबले आहेत.

हेही वाचा: आवक घटली तरी घसरण कायम! कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल

बाहेरून कापूस आणणे परवडत नाही

एकीकडे शेतकरी चांगल्या दराच्या तर बाजार कापसाच्या प्रतीक्षेत आहे. या परिस्थितीचा परिणाम जिनिंग उद्योगावरही होत आहे. जिनिंग कधी बंद व कधी चालू ठेवाव्या लागत आहे. जादा दरात खरेदी तसेच मालवाहतूक दर पाहता बाहेरून कापूस आणणे जिनिंगचालकांना परवडत नसल्याने सध्या जिनिंग उद्योग थंडच असल्याचे जिनिंग मालक महेंद्र दुग्गड म्हणाले.

जिनिंगचालक बेजार

कापूस गठाणीचे भाव सोमवारी ६६ हजार ५०० रुपये खंडी होते. रविवारपर्यंत ६७ हजार ५०० रुपये भाव होता. या भावामध्ये सोमवारी एक हजार रुपयांची घसरण झाली. कापूस दराच्या चढ-उतारामुळे आतापर्यंत जिनिंगवाल्यांना एका खंडीमागे एक ते तीन हजारांपर्यंत आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.

वाचा : 23 हजार जनावरांच्या मृत्यूने बैलबाजार गोत्यात! राज्यभरातील पशुपालक अडचणीत