भाजीपाला दरात घसरण! टोमॅटोचे दर पुन्हा कोसळणार?


Last Updated on November 27, 2022 by Piyush

नाशिक : खरीप हंगामातील लागवड केलेला भाजीपाला, फळभाज्या यांना काही दिवस भाव (Vegetable prices) मिळाला, पण रब्बी हंगामात विक्रीसाठी तयार झालेला माल कमी दरात विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. शेतकऱ्यांनी (farmer) तोडणी करून बाजारात विक्रीसाठी आणायला सुरुवात केली तोच भाजीपाला आणि फळभाज्याचे गगनाला गेलेले दर खाली आले. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, दुधी भोपळा, दोडका, गिलके, वांगे यांची लागवड केली जाते. कोथिंबीर, शेपू, पालक. मेथी या पालेभाज्या कमी दिवसात काढणीसाठी येतात. त्यामुळे त्यांची लागवड मोठया प्रमाणात केली जाते. यंदा पाऊस भरपूर आला. शेतकऱ्यांनी तातडीने शेतात मशागत करून लागवड केली.

हिवाळी टोमॅटो हंगाम सुरू झाला. बांग्लादेश, पाकिस्तान या देशांत नाशिकचे टोमॅटो निर्यात होतात. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी टोमॅटो पिकाला नगदी पीक म्हणून लागवड करू लागले. त्यामुळे लागवड क्षेत्रात वाढ झाली. मागील वर्षी चांगला दर मिळाला होता. त्यामुळे काहीअंशी शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रात जास्त लागवड केली.

दोन महिन्यांपूर्वी टोमॅटो वीस किलो जाळी ५०० रुपये विकली जायची. तीच जाळी आज २०० रुपये सरासरी विकली जात असल्यामुळे टोमॅटोचे भाव कोसळून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. पंधरा दिवसांनी दुप्पट टोमॅटो मार्केटला येणार आहे. त्यामुळे भाव आणखी कमी होतात का, याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरानामुळे दोन वर्ष अडचणीची गेली, आता तरी फायदा होइल असे वाटत होते.

हंगामाच्या सुरुवातीलाच फटका

फ्लॉवरचे भाव कोसळले आहे, दुधी भोपळा, कारले, सिमला मिरची, दोडके यांचे भाव पंधरा दिवसांपूर्वी होते. त्यापेक्षा निम्मे कमी झाले आहेत. पालेभाज्यांचे भाव स्थिर नाही. कोथिबीर, शेपू, मेथी यांचे दर प्रत्येक दिवशी कमी होत आहे. हिवाळा टोमॅटो पीक दोन महिन्यांत सुरु होते. सरासरी लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जाते आणि ऑगस्ट महिन्यात पिकाचा पहिला तोडा येतो. जोरदार सुरुवात झाल्याने यंदा शेतकरी मोठ्या आशेने पिकांकडे वळला होता. चार पैसे पदरात पडतील अशी अपेक्षा होती. यंदा झीज भरून निघेल अशी अपेक्षा असली तरी हंगामाच्या सुरुवातीला भाव गडगडले आहेत.

वाचा : जळगावच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले उन्हाळी हंगामी तिळाचा वाण