प्रत्येक मुकादमांना आठ लाख रुपये देऊनही तोडणीसाठी ऊसतोड मजूर अद्याप येईनात!


Last Updated on November 24, 2022 by Vaibhav

अनगर : सोलापूर जिल्ह्यातील गळीत हंगाम सुरू झाला असून ऊस गाळपासाठी तोडणी कामगार यांचे ऊस वाहतूक ठेकेदारांनी पूर्वी नियोजन करून त्या कामगार मुकादमांना प्रत्येक टोळीला आठ ते दहा लाख रुपये दिले आहेत. आठ ते दहा लाख रुपये देऊनही कामगार ठरल्याप्रमाणे आले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस . वाहतूक ठेकेदार संकटात सापडले आहेत.

ते ट्रॅक्टर मालक हे सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांची उपजीविका, मुलांच्या शिक्षणसाठी, मुलांचे, मुलींचे लग्न यासाठी ऊस वाहतुकीचे काम करीत आहेत. ऊस तोडणीसाठी लागणारे कामगार बीड, मध्यप्रदेश, लातूर, नांदेड जिल्ह्यातील आहेत. यांना या ट्रॅक्टर मालकाने प्रति टोळी मुकादम यांच्याकडे टोळीतील कामगारांना ठरल्याप्रमाणे आठ ते दहा लाख रुपये रोख रक्कम देऊन नोटरी करून घेऊन ऊस तोडणीसाठी येण्याचा ठराव करून देखील कामगार आले नाहीत. ही रक्कम परत द्या म्हणून त्यांच्याकडे मागणी केली असता ऊस वाहतूक ठेकेदारावरच मारहाण तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरू केली आहे

ऊसापासून तयार होणारी साखर गोड परंतु ऊस वाहतूक ठेकेदारासाठी कडू म्हणण्याची वेळ आली आहे. अशा या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शासन दरबारी कामगार अधिनियम सारखा कायदा ऊस वाहतूक ठेकेदार अधिनियम कायदा करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी, अशी मागणी ऊस वाहतूक ठेकेदारांकडून होत आहे.

आम्ही आमची उपजीविका भागवण्यासाठी ऊस वाहतूक ठेकेदारी करीत आहे. त्या ऊस तोडणी कामगारांना आम्ही दिवाळीच्या सणाला मुलांना नवीन कपडे देखील न घेता यांच्या पैशाची जुळवणी करून आम्ही त्यांना दिले आहेत. आज ते ठरल्याप्रमाणे आले नसून आमच्यावर आत्महत्या करण्यासारखी वेळ आली आहे. रतिलाल बंडगर

डबल ग्रॅज्युएशन असून पत्नीचे मंगळसूत्र, जमीन गहाण, कारखान्याची उचल घेऊन ऊस तोडणी कामगारांना दिले आहेत. ठरल्याप्रमाणे न आल्याने उपासमारीची वेळ आली आहे. बेंबळे येथील ऊस वाहतूक ठेकेदार दिलेली रक्कम मागण्यासाठी मध्यप्रदेश येथे गेला असता त्यांची हत्या करण्यात आली. महाराष्ट्रसह सोलापूर जिल्ह्याने याची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी. अमर माने

हेही वाचा: संतप्त कांदा उत्पादकांनी देवळ्यात लिलाव पाडले बंद