मजूर देता का मजूर? कापूस उत्पादक चिंतित !


Last Updated on January 3, 2023 by Vaibhav

अब्दुल मजीद / दहीहांडा : गरसोळी, पातोंडा, हिंगणी, दहीहांडा परिसरात कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी कापूस मोठ्या प्रमाणात फुटला असून, मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडत आहे. त्यामुळे मजुरासाठी दारोदार भटकण्याची वेळ शेतकन्यावर आली आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजला आहे. तरीसुद्धा प्रत्येक हंगामात शेतकरी नव्या उमेदीने प्रत्येक संकटाला तोंड देऊन शेती करीत असतो.

आता नैसर्गिक संकटासोबतच वाढलेले मजुरीचे दर, मजुराची कमतरता यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कापूस उत्पादकांना मजूर मिळत नसल्याने अडचणी वाढ झाली आहे.

बाहेरगावावरून मजूर बोलावले! मजुरांना वाढीव दराने मजुरी देऊनसुद्धा मजूर मिळेनासे झाले, त्यामुळे परिसरात शेतकऱ्यांचे पूर्ण कुटुंब शेतात राबताना दिसत आहे. मजूर मिळत नसल्याने शेतीची कामे करण्यात अनेक अडचणी येत असल्याने बाहेरगाव वरून मजूर आणून शेतीची कामे करावी लागत आहे, परंतु बाहेरगावावरून शेत मजूर आणताना जास्तीचे पैसे मोजावे लागत असल्याने आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना परवडणारे नाही.

भाड्याचा प्रश्न

बाहेरगावावरुन शेतमजूर आणायचे म्हणजे चारचाकी वाहन किंवा ऑटोरिक्षा भाड्याने करावा लागतो. त्यात जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे काय करावे व काय करू नये, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

आर्थिक अडचण

यावर्षी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अशा अनेक समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यात मजुरांचा प्रश्न गंभीर आहे.

शेतात कापूस मोठ्या प्रमाणात फुटला असून, मजूर मिळत नसल्याने कापसाचे बोड लोंबकळत आहेत. कधी वेचणीला मजूर मिळेल, याची चिंता लागली आहे. मजूर न मिळाल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. – संदीप तरोळे, शेतकरी, गरसोळी

अल्पभूधारक शेतकरी असून, शेतात तीन एकर कपाशीची लागवड केली आहे. आता दोन-तीन दिवसापासून वातावरणातील बदलामुळे बोड पूर्णतः फुटली आहे. दहा रुपये किलो प्रमाणे दर देऊन सुद्धा मजूर मिळत नाही.-आशिष मगर, शेतकरी, दहीहांडा

हेही वाचा: नासाकाकडून शेतकऱ्यांना उसाचे देयक अदा