Last Updated on December 28, 2022 by Vaibhav
नाशिक : हॉटेलमधील वाद मिटविल्याने टोळक्याने एकास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना अशोका मार्ग भागात घडली. या घटनेत तरुणाच्या डोक्यात दगड टाकून त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून, याप्रकरणी चार जणांच्या टोळक्याविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
तौसिफ पिंजारी आणि आदित्य गायकवाड अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून, राहुल ब्राह्मणे व ललित शिंदे (सर्व रा.बजरंगवाडी) हे दोघे त्यांचे साथीदार अद्याप फरार आहेत. याप्रकरणी नरेंद्र राजेंद्र खैरनार (वय २३, रा. अमरधाम रोड, भद्रकाली) या जखमी युवकाच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खैरनार रविवारी (दि. २५) रात्री अशोका मार्ग भागात गेला होता. राहुल जाधव व सूरज सोनवणे या मित्रांसमवेत तो गणेशबाबा रोडवरील कार्तिकी टी स्टॉल भागात उभा असताना ही घटना घडली.
तिघे मित्र गप्पा मारत असताना संशयित टोळक्याने त्यांना गाठले. रोहित म्हस्के(Rohit Mhaske) या मित्रासमवेत हॉटेलमध्ये झालेला वाद का मिटवला, या कारणातून संशयित ब्राम्हणे याने खैरनार यांच्याशी वाद घातला. यावेळी टोळक्याने शिवीगाळ करीत खैरनार यास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी संतप्त ब्राह्मणे याने खैरनार यांच्या डोक्यात वजनी दगड मारून जखमी केले तसेच जिवे मारण्याच्या हेतूने धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केले. या घटनेत खैरनार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास निरीक्षक आहिरे करीत आहेत.
हेही वाचा: नायलॉनच्या मांजाने वृद्ध रक्तबंबाळ