Last Updated on December 30, 2022 by Vaibhav
कारेगाव : रब्बी हंगामातील कांदा लागवडी सध्या जोरात सुरू आहेत. ऑक्टोबरमध्ये पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी कांदा बी टाकले होते. ते आता लागवडीस योग्य झाल्याने शिरूर तालुक्याच्या सर्व भागांत लागवडी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे; परंतु मागील वर्षीच्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा पिकाखालील क्षेत्र कमी केले आहे. मात्र मका, गहू, ऊस या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील सततच्या पावसाने शेतकऱ्यांना कांदा बी टाकता आले नाही. त्यामुळे आगामी रब्बी कांदा लागवडीचे प्रमाण कमी आहे. मागील वर्षी पुणे जिल्ह्यातील रब्बी हंगामात सर्वाधिक कांदा लागवड शिरूर तालुक्यात झाली होती. फेब्रुवारी अखेरपर्यंत चांगले बाजारभाव राहिल्याने अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षी लेट रब्बी लागवड केली होती.
पुढील काळात साठवणूक करूनही बाजारभाव घसरलेले राहिल्याने शेतकरी कमी क्षेत्रात कांदा लागवड करत असल्याचे दिसून येत आहे. कांद्याचा उत्पादन खर्च मका, गहू यांच्या तुलनेत जास्त आहे. कांद्याला एकरी सुमारे ४० हजार रुपयांपर्यंत खर्च येत आहे. बाजारभाव २० रुपये प्रतिकिलोपेक्षा कमी मिळाल्यावर कांदा पिकातून उत्पादन खर्च भागविणेसुद्धा शक्य होत नाही. त्यामुळे शेतकरी मकासारख्या पिकाकडे वळला आहे. मागील काही कांद्याचे महिन्यांपासून सातत्याने मकाचे दर सुमारे १३ ते १६ रुपयांच्या दरम्यान मिळत असल्याने मोठ्या संख्येने शेतकरी मका पिकाकडे वळला आहे. मका पिकाचा उत्पादन खर्च कमी होत असून तीन महिन्यांच्या आत मका काढणी योग्य होत असल्याने शेतकरी समाधानी आहेत.
मजुरांचा तुटवडा
1. कांदा पीक लागवडीपासून काढणीपर्यंत मजुरांची आवश्यकता असते. पावसाने उघडीप दिल्याने एकाचवेळी अनेक शेतकऱ्यांनी कांदा बी टाकल्याने रोपे लागवडीसाठी योग्य झाली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लागवडीसाठी मजुरांचा तुटवडा जाणवत आहे.
2. कांदा लागवड करण्यासाठी ४०० रुपये एक दिवसाची मजुरी झाली आहे. तर ६५०० ते ७५०० हजार रुपयांपर्यंत एकरी लागवड केली जात आहे. बाहेरून महिला मजूर आणावे लागत असल्याने वाहतूक खर्चाची भर पडत आहे. एक आठवडा रात्रपाळी व दुसऱ्या आठवड्यात दिवसपाळीत विद्युतपुरवठा होत असल्याने लागवडीवर परिणाम होत आहे.
मागील वर्षी मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात कांदा लागवड झाली. उत्पादन चांगले झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवला. परंतु, अपेक्षित दरवाढ न झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागला असून केंद्र व राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षीसुद्धा मोठा आर्थिक फटका बसेल.-राहुल कर्पे, सामाजिक कार्यकर्ते,
हेही वाचा: केळी लागवड क्षेत्रातील आकडेवारीत तफावत