सोयाबीनच्या दरात मंदी कायम; शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली


Last Updated on November 28, 2022 by Piyush

जालना : बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ कमी असून, धान्य व किराणा मालाच्या दरांत मंदी आहे. सोन्या- चांदीच्या दरात देखील घसरण झाली असून, सोयाबीनच्या दरातील मंदी शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे. वाढीव दर मिळत असल्याने बहुतांश कारखान्यांनी साखर निर्यातीवर लक्ष केंद्रित केले आहे.

चालू वर्षात पाऊस चांगला झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात मोठी वाढ झाली. मागणीपेक्षा अधिक उत्पादन झाल्यामुळे सोयाबीनचे दर घसरले. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला केंद्र शासनाने तेलबिया आणि खाद्यतेलावरील निर्बंध हटविले, म्हणजेच स्टॉक लिमिट काढून घेतली. परिणामी, तेलबियाचे दर वाढतील असा अंदाज होता. त्याप्रमाणे तेलबियांचे दर वाढले. मात्र, अपेक्षित अशी वाढ झाली नाही.

आता स्टॉक लिमिट काढल्यानंतर अवघ्या वीस दिवसांत पुन्हा एकदा तेलबियाच्या दरात विशेषतः सोयाबीनच्या बाजारभावात घसरण होत आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोयाबीनची विक्रमी आवक झाली. मात्र, दर पडल्याने दुसऱ्या दिवशी आवक कमी झाली. सध्या सोयाबीनची आवक दररोज आठ हजार पोते आवक असून, ४०० रुपयांची मंदी आल्यानंतर भाव ५००० ते ५७०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

तुरीची आवक चांगली असली तरी कीड लागल्याने दर्जा निकृष्ट आहे. विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम तसेच मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील तुरीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात कीड दिसून आली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे तुरीचे नुकसान झाले आहे. सध्या तुरीची आवक दररोज शंभर पोते इतकी असून ५०० रुपयांची मंदी आल्यानंतर भाव ५८०० ते ६८०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

सोयाबीनचे दर सध्या कमी झालेले आहेत. त्यामुळे अद्यापही अनेक शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन बाजारात आणण्याऐवजी ते घरातच साठवून ठेवण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. एकूणच पुढील महिन्यांत ज्यावेळी सोयाबीनची आवक कमी होईल, त्यावेळी भाव वाढलेले असतील, या आशेवर शेतकऱ्यांनी सध्या लगेचच बाजारात सोयाबीन आणण्याचे टाळले असल्याचे चित्र आहे.

जागतिक परिस्थिती अस्थिर

जागतिक परिस्थिती अस्थिर असल्यामुळे आगामी काळात सोने आणि चांदीचे दर अस्थिर राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जाणकारांच्या म्हणण्यानुसार, जागतिक मंदी विविध देशांत दरम्यान निर्माण झालेला तणाव आणि वाढत असलेले महागाई या कारणामुळे आगामी काळात कमी-अधिक प्रमाणात सोने आणि चांदीचे दर तेजीत राहण्याची शक्यता अधिक आहे.

मात्र, सरत्या आठवड्यात सोन्याच्या दरात तोळ्यामागे ५०० रुपयांची आणि चांदीमध्ये किलोमागे ५०० रुपयांची मंदी आली. सोन्याचे दर ५२५०० रुपये प्रति तोळा आणि चांदीचे दर ६१५०० रुपये प्रति किलो असे आहेत.

वाचा : आफ्रिकन मलावी हापूस एपीएमसीत दाखल