Rain update: महाराष्ट्रावर घोंगावतेय चक्रीवादळाचे संकट! पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा


Last Updated on December 7, 2022 by Piyush

Rain Maharashtra News: बंगालच्या उपसागरात अंदमानच्या दक्षिणेकडील (Bay of Bengal) तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे येत्या काही तासांत चक्रीवादळात (Hurricane) रुपांतर होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उत्तरेकडे तामिळनाडू किनारपट्टी आणि पुद्दुचेरीकडे सरकण्याची शक्यता आहे.

हे चक्रीवादळ घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरणारे आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातून (maharashatra) हे चक्रीवादळ पुढे जाणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अवकाळी पावसाची (Unseasonal rain) शक्यता आहे. मात्र, ढगाळ वातावरणाव्यतिरिक्त त्याचा विदर्भावर कोणताही परिणाम होणार नाही.

ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी माहिती दिली आहे की आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तामिळनाडू, पदुच्चेरी, कराईकल या भागात सात ते 10 डिसेंबर दरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात थंडीची लाट कमी होऊन ढगाळ वातावरण राहणार आहे.

सध्या उत्तर-पश्चिमेकडील वातावरणाच्या प्रभावामुळे थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. नागपूरसह विदर्भात अंशत: ढगाळ वातावरण असून पुढील काही दिवस असेच राहील. ढगाळ वातावरणामुळे दिवसा आणि रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे.

नागपुरात मंगळवारी किमान तापमान 15.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सरासरीपेक्षा 1.7 अंशांनी जास्त आहे. यवतमाळ, अकोल्यात पारा 18 अंशांवर पोहोचला आहे. सरासरीत असलेल्या गोंदिया व गडचिरोलीवगळता इतर जिल्ह्यात रात्रीचा पारा चढला आहे. दिवसाच्या तापमानातही काही अंशांची वाढ दिसून येत आहे.

नागपुरात 30.4 अंश कमाल तापमानाची नोंद झाली. येत्या तीन दिवसांत रात्रीच्या तापमानात 4 अंशाने आणि दिवसाच्या तापमानात 2 अंशांनी वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

नंतर वाढू शकतो थंडीचा जोर…

दरम्यान, तापमानाचा पारा वाढल्याने थंडीचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. दिवसा गारव्याऐवजी ऐवजी उष्णतेची अनुभूती होत आहे. रात्री बाहेर थंडी असली तरी घरात थोडी उष्णता जाणवते. त्यामुळे बंद पडलेले पंखे पुन्हा सुरू झाल्याचे चित्र आहे. पहाटेच्या वेळी थंडी जास्त जाणवत असली तरी. पुढील काही दिवस किंवा आठवडाभर ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. यानंतर थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

वाचा : माथेरानमध्ये आजपासून ई-रिक्षा धावणार, नागरिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण