Cloudy Weather: ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका; शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार!


Last Updated on December 12, 2022 by Piyush

Cloudy Weather in Maharashtra : वातावरणात अचानक बदल झाल्याने रब्बी हंगामातील पिकांना हानी पोहोचण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका बसल्यास शेतकऱ्यांची डोकेदुखी आणखी वाढणार आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटातून जावे लागते. शेतमाल घरी आल्यानंतर विविध आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी शेतमाल विक्री करावा लागतो. शेतकऱ्यांचा शेतमाल तयार झाला की बाजारभाव गडगडतात, याचा अनुभव यंदाही शेतकऱ्यांना येत आहे. यंदाच्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन घेता आले नाही.

ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे हाताशी आलेल्या सोयाबीन, कापूस या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसामुळे शेतात बरेच दिवस पाणी साचले होते, शेतात जास्त प्रमाणात ओलावा असल्याने रब्बीसाठी शेती तयार करता येत नव्हती.

या सर्व संकटांवर मात करीत मोठ्या उमेदीने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, हरभरा, करडई आदी पिकांची पेरणी केली. पावसाळ्यात दमदार पाऊस पडल्याने रब्बीच्या क्षेत्रात थोडी वाढ झाली. गत दोन दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.

रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने गहू, हरभरा, तूर पिकावर रोगराई येण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तविली जात आहे. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण कायम राहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे रब्बी पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढण्यासह पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

गेल्या वर्षभरापासून विविध नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांचा पिच्छा पुरवित असल्याचे दिसत आहे. खरीप हंगामात अगोदरच पिकांना फटका बसलेला असताना, आता पुन्हा ढगाळ वातावरणामुळे रब्बीतील पिके संकटात सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कीड नियंत्रणासाठी फवारणी अपेक्षित

ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा, तूर पिकांवर रोगराई येण्याची शक्यता आहे. विविध किडींचा प्रादुर्भाव आढळून येताच, कृषी विभागाच्या सल्ल्याने शेतकऱ्यांनी कीड नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे अपेक्षित आहे.

वाचा : कुरतडलेल्या सोयाबीनवर शासन करणार का फवारणी ?