गुगलवर भारतीयांनी सर्वाधिक शोध घेतला क्रिकेटचा


Last Updated on December 8, 2022 by Vaibhav

अभिनेत्री सुश्मिता सेन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पनीर पसंदाने मिळवली पसंती

मुंबई यंदाचे वर्ष सरत आले. सरत्या वर्षात गुगलवर सर्वाधिक कशाचा शोध घेण्यात आला याची जंत्रीच गुगलने जारी केली. गेल्या वर्षी गुगलचे अवकाश कोविडने व्यापले होते. यंदा नेटकऱ्यांच्या शोधमोहिमेचा ट्रेण्ड हा खेळ आणि मनोरंजनाकडे अधिक असल्याचे दिसून आले. सोबतच रोजच्या आयुष्यातल्या गोष्टींसाठी नागरिकांनी शोधमोहिमेतून जास्त वेळ गुगलवर व्यतित केल्याचे दिसले. नेटकऱ्यांच्या शोध यादीत भारतात सर्वात जास्त शोध क्रिकेटचा घेण्यात आला.

पाठोपाठ फुटबॉललाही महत्त्व देण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे गुगलवर सर्वात जास्त शोध घेतलेल्या व्यक्तींमध्ये अभिनेत्री सुश्मिता सेन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागा मिळवली. खाद्यान्नांमध्ये ‘पनीर पसंदा’ ने जागतिक स्तरावर पहिली पसंती मिळवली.कोरोनाची लाट आणि त्यापोटी निर्माण झालेली भीती ओसरू लागताच नागरिकांचे आयुष्य पूर्वपदावर येऊ लागल्याचे गुगल सर्च ट्रेण्डने दाखवून दिले. २०२२ च्या सर्च ट्रेण्डमध्ये भारतातून सर्वात जास्त क्रिकेटला पसंती मिळाली. त्यातल्या त्यात आयपीएल. त्यानंतर कोव्हीन, फिफा वर्ल्ड कप, टी-२० विश्वचषक स्पर्धा यासंबंधीची माहिती सर्वाधिक सर्च झाली. त्यानंतर भारतीयांनी झाडून अनेक सरकारी योजनांचा सर्वाधिक शोध घेतला. त्यात ‘इ-श्रम’ कार्ड, अग्निपथ योजना, कोविड लस प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. यासोबत ‘माझ्या ‘जवळ’ अर्थात घराजवळच्या सुविधा शोधणाऱ्यांनाही यादीत स्थान मिळवले. त्यात तरणतलावांचा दुसरा क्रमांक आहे. वॉटर पार्कने तिसरा क्रमांक मिळवला.

चित्रपटांच्या दुनियेत ब्रह्मास्त्र आणि के जीएफ-२ यांचाच बोलबाला राहिला. त्यानंतर काश्मीर फाईल्स, लालसिंग चढ्ढा, दृश्यम २, आरआरआर आणि पुष्पा या चित्रपटांबाबत माहिती शोधण्यात आली. सर्वात जास्त शोधली गेलेली व्यक्तिमत्त्वे म्हणजे भाजप नेत्या नुपूर शर्मा, राष्ट्रपती द्रौपती मुर्मू, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेन. २०२२ च्या जुलै महिन्यात सुशने प्रेमाची कबुली दिली. आयपीएल माजी चेअरमॅन व व्यावसायिक ललित मोदींना डेट करत असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यामुळेच २०२२ वर्षात सर्वाधिक सर्च झालेल्या टॉप १० व्यक्तींच्या यादीमध्ये त्यांनी स्थान मिळवले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री(CM)एकनाथ शिंदे यांचाही या यादीत समावेश आहे. जागतिक पातळीवर मात्र हॉलीवूड अभिनेता जॉनी डेपने अव्वल स्थान मिळवले. ‘पायरेटस ऑफ कॅरेबियन’ चित्रपटाचा नायक असलेला कॅप्टन जॅक स्पॅरो म्हणजेच जॉनी डेप हा पत्नी अंबर हर्डशी सुरू असलेल्या कौटुंबिक खटल्यामुळे शोधमोहिमेत आघाडीवर दिसला.. अर्थात त्याच्या पाठोपाठ त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचाही नेटकऱ्यांनी तितकाच शोध घेतला. त्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा क्रमांक लागतो. युक्रेनविरोधात युद्ध छेडून त्यांनी या यादीत स्थान मिळवले. ‘ब्रेकिंग न्यूज’ शोधणाऱ्यांनी सर्वात जास्त शोध भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने घेतला.

त्यापाठोपाठ पंजाबी गायक सिद्ध मुसेवाला याच्या खुनाच्या बातमीला नेटकऱ्यांनी जास्तवेळा शोधले. संगीत जगतात आदित्य ए. च्या ‘चांद बालियाँ’ या गीताने पहिला क्रमांक मिळवला. यापाठोपाठ अल्लू अर्जुनच्या भन्नाट डान्स स्टेप असलेल्या ‘श्रीवल्ली’ या गाण्याने जागतिक पसंती मिळवली. याच सोबत ‘हाऊ टू’ म्हणजेच कोविड लसीकरणा प्रमाणपत्र कसे मिळवावे, प्रोफेशनल टॅक्स रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कसे मिळवावे, याचा सर्वात जास्त शोध भारतातल्या नेटकऱ्यांनी घेतला. पनीर पसंदाने जागतिक शोधमोहिमेत पहिला क्रमांक मिळवला, तर मोदकाने दुसरा क्रमांक पटकावला.हेही वाचा:उष्णतेच्या लाटांचा भारताला धोका! जागतिक बँकेच्या अहवालातून गंभीर इशारा