कापसाच्या भावाला उतरती कळा; कापूस उत्पादकांनी केली बाजारकोंडी!


Last Updated on December 20, 2022 by Piyush

जळगाव: खान्देश, विदर्भ, मराठवाड्याची आर्थिक नाडी असलेल्या कापसाच्या भावाला (cotton rate) उतरती कळा आली असून शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबवल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. बाजारपेठा थंडावल्या असून कापूस उत्पादकांनी व्यापाऱ्यांची बाजारकोंडी केली आहे.

शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या कापसाला यावर्षी अपेक्षित दर मिळत नसल्याने बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कापूस उत्पादक शेतमालाला व कापसाला अपेक्षित भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत असून शेतमाल विक्री करण्यास अद्यापही शेतकरी धजावत नाहीत.

यामुळे बाजारपेठेत कोंडी झाली असून याचा उलाढालीवर भीषण परिणाम पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी कापसाला १४ हजारापर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. यावर्षी १५ हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा जास्त भाव अपेक्षित असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांनी भाव मिळाल्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र प्रत्यक्षात व्यापारी कापसाला आठ हजारापर्यंत खरेदी प्रतिक्विंटल भाव देत आहेत. यामुळे अद्यापही शेतकऱ्यांकडे ९० टक्के कापूस घरात पडून आहे.

कधी दूर होणार कापूसकोंडी ?

कापसाला अपेक्षित भाव नसल्याने शेतकरी कापूस विक्री करीत नाहीत. यातच व्यापाऱ्यांकडून कमी भावात माल खरेदी केला जात आहे. यामुळे बाजारपेठ ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून कापसाला किमान दहा ते बारा हजार रुपये प्रतिक्विटल भाव मिळावा, अशी शेतकन्यांची मागणी आहे.

कापूस गठाणीचा भाव जास्त असल्याने भारतीय गठाणीची मागणी कमी होत आहे. गठाणीचा भाव कमी असल्याने कापसाला भाव कमी आहे. अद्याप ५ टक्के मालच खरेदी झाला आहे. -प्रमोद सोनार, संचालक, श्री गजानन जिनिंग, पाचोरा.

कापूस गठाणीला मागणी नसल्याने, उत्पन्न जास्त व भाव कमी झाल्याने जीनिगला माल येत नाही. यामुळे जिनिंग बंद आहे. केंद्र सरकार सीसीआयतर्फे खुल्या बाजारात लवकरच खरेदी सुरु करीत आहे. – प्रवीण पाटील, कापूस खरेदीदार.

यावर्षी कापसाला चांगला भाव येईल, अशी अपेक्षा होती. मात्र भाव कमी असल्याने कापूस विक्री न करण्याचे ठरविले आहे. दहा हजारापेक्षा जास्त भाव येईल तेव्हाच कापूस विक्रीस काढणार आहे. – एम. डी. पाटील, कापूस उत्पादक, तारखेडा खु.

कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांचा कापूस विक्री होत नाही. बाजारपेठेत पैसा मोकळा होत नसल्याने बाजारपेठांमध्ये मंदी अली आहे. – विशाल सराफ, एम. ए. सराफ सुवर्णपेढी, पाचोरा.

वाचा : कुक्कुट खाद्यात होणार आता प्रथिनेयुक्त अळ्यांचा वापर