कापूस दहा हजारी, सरकीचीही गिरकी..! दरवाढीने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या


Last Updated on November 19, 2022 by Piyush

जळगाव : गणेश चतुर्थीच्या मूहूर्तावर कापसाला १४ हजारांचा भाव मिळाला होता. सद्य:स्थितीत कापसाला ९,६०० रुपये भाव मिळत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दुसरीकडे सरकीच्या भावात चढउतार होत आहेत. सरकीला आधी चार हजार भाव होता. तो आता ३,८०० वर आला आहे.

एकीकडे भाववाढीची आशा तर दुसरीकडे फरदडची निराशा आहे. त्यात कापूस वेचणीचा खर्च बारा रुपये किलो आहे. त्यात मजुरांना येण्याजाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

कापसाची पंढरी असलेल्या बोदवड तालुक्यात गणेश चतुर्थीला कापसाच्या खरेदीचा शुभारंभ झाला आणि तब्बल चौदा हजाराचा भाव मिळाला. प्रत्यक्षात कापसाची खरेदी पाच किलो एवढीच झाली. पण या मुहूर्ताच्या भावाने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या.

परंतु ज्यावेळी कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला त्यावेळी मात्र ७, ८०० रुपये क्विंटल असा भाव मिळाला. इकडे भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला. परंतु दसरा-दिवाळी आली आणि गेली पण भाव आठ हजाराच्यावर गेला नाही. तरीही काही शेतकऱ्यांनी आहे त्या किंमतीत कापूस विकून दिवाळी साजरी केली.

जिनिंगची चाके थबकली

ऑक्टोबर उलटून गेला तरी पाहिजे त्या प्रमाणात कापूस नसल्याने जिनिंगची चाके थांबली आहेत. शेवटी कापूस भाववाढ करण्याशिवाय पर्याय राहिला नाही, त्यामुळे नोव्हेंबर महिना सुरु होताच कापसाच्या भावाने उचल घेतली. १ नोव्हेंबर : ८,२००, १० नोव्हेंबर : ८,७००, १७ नोव्हेंबर : ९,३०० असा भाव होता. कापसाचा दर दहा हजारापर्यंत पोहचेल, अशी अपेक्षा आहे.

परतीच्या पावसाने खरीपावर पाणी फिरवले. या पावसाचा फायदा फरदड कापसाला होईल व कापसाचे उत्पादन वाढण्यास फायदा होईल ही आशा होती. – भीमराव तायडे, शेतकरी.

आज स्थितीला जागतिक बाजारात कापसाला उठाव नाही. सरकी चार हजार रुपयांवरुन ३८०० वर आली आहे. कापूस नसल्याने जिनिग चालवणे कठीण आहे. – शिरीष जैन, जिनिग संचालक, बोदवड.

कापसाची मागणी आणि पुरवठा यात तफावत होत आहे. सरकीचे भावही कमी झाले आहेत. परंतु सध्यस्थितीत भाव वाढतील, अशी शक्यता नाही. -जीवन बयस, जिनिग संचालक, धरणगाव.

जागतिक बाजारपेठेत कापूस व सोयाबीन या पिकांना उठाव नसल्याने व मंदीचे सावटआहे. त्यामुळे भाववाढीचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांनी खेडा खरेदीवर भर दिल्यास थेट उच्च प्रतीच्या मालाला जिनिगपर्यंत दिल्यास दोन पैसे जादा मिळतील. – विकास कोटेचा, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी, बोदवड.

वाचा : नवलकोल लागवड ठरतेय फायदेशीर